ठाणे - लायकी, पात्रता आणि योग्यता नसल्याने भाव दिला नाही, म्हणून एका माथेफिरू प्रेमवीराने तरुणीच्या घरात घुसून तिचा गळा घोटून खून केल्याची घटना डोंबिवलीत घडली. या घटनेनंतर आरोपीच्या डोंबिवली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा - खेळणी विकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, शोध सुरू
दीपक भणगे (22) असे आरोपीचे नाव असून तो डोंबिवली पूर्वेतील सुनिलनगर परिसरात असलेल्या जय मल्हार सोसायटीत राहणारा आहे. याच सोसायटीत ऐश्वर्या देशपांडे ही 19 वर्षीय तरुणी आपल्या पालकांसोबत राहते. ऐश्वर्यावर दीपक भणगे याची वाईट नजर आधीपासूनच होती. ऐश्वर्या ही महाविद्यालयीन विद्यार्थीनी आहे. तर, दीपकला कामधंदा नसल्याने तो उडाणटप्पू आहे. त्यामुळे ऐश्वर्या त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तेव्हापासून दीपकला तिच्याबद्दल चीड होती. त्याने ऐश्वर्यावर पाळत ठेवली होती. मंगळवारी ती एकटीच घरी होती. ही संधी साधून तो ऐश्वर्याच्या घरात घुसला व तिचा खून केला. संध्याकाळी ऐश्वर्याचे पालक घरी आले असता, त्यांना मुलाचा मृतदेह दिसल्याने धक्का बसला. त्यांनी डोंबिवली पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. तोपर्यंत दीपक भणगे बेपत्ता झाला होता.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ऐश्वर्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवला. त्यानंतर पोलिसांनी ऐश्वर्याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा नोंद केल्यानंतर तिचा मारेकरी दीपक भणगे याला मंगळवारी संध्याकाळी अटक केली आहे. आरोपी दीपक भणगे याने ऐश्वर्याचा खून केल्याची कारणासह कबूली दिली. मात्र, त्याच्या या कृत्याबद्दल परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.