ठाणे - संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. तर काही देश पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीत आहेत. कोरोनामुळे भारतात देखील अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली. तसेच इतर सणांप्रमाणे दिवाळी सणावर देखील कोरोनाचे सावट असणार आहे. मात्र, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय घरगुती फराळाला परदेशात मोठी मागणी आहे. त्यात घट व्हायच्या ऐवजी वाढ झाल्याचे ठाण्याच्या उद्योजिका मेधा देशपांडे यांनी सांगितले.
गेली वीस वर्षे ठाण्यातील वसंत विहार येथे राहणाऱ्या मेधाताई अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशात फराळ पाठवतात. चकल्या, लाडू, करंज्या सोबतच तिखट शेव या फराळाला मोठी मागणी असल्याचे मेधा देशपांडे सांगतात. संपूर्ण फराळ स्वच्छ वातावरणात साजूक तूप आणि उत्कृष्ट जिन्नस वापरून घरातच बनवले जाते. त्यामुळे ते ग्राहकांच्या पसंतीस उतरते, असे त्या अभिमानाने सांगतात.
आत्तापर्यंत चारशे ते पाचशे किलो फराळ निर्यात-
यावर्षी देखील त्यांना अमेरिकेतून ऑर्डर मिळाल्या आहेत. तसेच युरोप आणि आखाती देशातून जास्त मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. इंग्लंड, आयर्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, अमेरिका सोबतच दुबई, ऑस्ट्रेलिया सारख्या देशातून फराळाला प्रचंड मागणी आहे. आत्तापर्यंत चारशे ते पाचशे किलो फराळ निर्यात केला असून येणाऱ्या काळात ही मागणी आणखी वाढणार असल्याचे मेधा देशपांडे यांनी सांगितले.
आपुलकी जपत समाधान देण्याचा प्रयत्न-
जेव्हा आपण परदेशात असतो. तेव्हा आपल्याला आपले सन उत्सव आणि आपली माणसे यांची आठवण येत असते. दिवाळीमुळे आपुलकी जपत त्यांना समाधान देण्याचा हा प्रयत्न असल्याचे देशपांडे यांचे मत आहे.
हेही वाचा- दिवाळीच्या सुटीवर शिक्षणमंत्र्यांचा यू-टर्न, २४ तासांत बदलला निर्णय