ठाणे - आपल्याशी साखरपुडा करून लग्न न करता दुसऱ्या तरुणाशी लग्न केल्याच्या वादातून तरुणाने लग्न मोडणाऱ्या विवाहितेचा बदनामीकारक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. शिवाय विवाहितेला व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपये खंडणीचीही मागणी केली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशोक ढाका असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो राजस्थान राज्यातील जोधपूर जिल्ह्यात रहिवाशी आहे.
व्यसनी असल्याने मोडलं लग्न
या घटनेतील २६ वर्षीय तक्रारदार कल्याण पश्चिम भागात राहतो. त्याचे लग्न सन २०१७ मध्ये एका तरुणीशी झाले. मात्र या तरुणीचे लग्न होण्याआगोदर तिचे लग्न सन २०१५ मध्ये राजस्थान राज्यातील गावाकडे राहणाऱ्या अशोकशी ठरले होते. परंतु चौकशी केल्यानंतर तरूणीच्या घरच्यांना लग्न जमलेला तरुण व्यसनी आहे, तो सर्व प्रकारची व्यसने करतो व कोणतेही काम करत नाही. तसेच कोणाशीही वाद घालतो. त्यामुळे त्याच्या घरचे लोकही त्याला कंटाळले आहेत. त्यामुळे त्याचवेळी तरुणीने लग्न मोडले होते.
खंडणीसाठी बदनामीकारक फोटो व्हायरल
साखरपुडा होऊन लग्न मोडल्याने आरोपी अशोकने तरुणीची बदनामी करण्याचे ठरवून होता. तर दुसरीकडे आरोपीशी लग्न मोडून त्या तरुणीचे २०१७ साली कल्याणात राहणाऱ्या तरुणाशी लग्न केले. हे कळताच आधी लग्न जुळलेल्याने आरोपीने विवाहितेला तेव्हापासूनच त्रास देण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही दिवसापूर्वीच त्याने विवाहितेसह तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन दहा लाख रूपये खंडणी मागितली. विशेष म्हणजे त्याने लग्न मोडणाऱ्या तरूणीचे बदनामीकारक फोटो एडीट करून ते इंस्टाग्रामवर फेक आयडी बनवून व्हायरल करून बदनामी केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे भयभीत झालेल्या विवाहितेच्या २६ वर्षीय पतीने ४ मार्च रोजी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी अशोक विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला नसून पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख आणि त्यांचे सहकारी त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत अन् पंतप्रधान डमरू वाजवतायेत;सामनातून आसूड