ठाणे - मुंब्रा रेतीबंदर खाडी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि पालिका आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोहोचली असून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान, हा मृतहेह नौपाडा परिसरातील ज्वेलर्स भरत जैन यांचा असल्याची माहिती आहे. मात्र, ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
१५ ऑगस्ट रोजी लापता असल्याची तक्रार -
भरत जैन हे सराफा व्यावसायिक होते. ते १५ ऑगस्टपासून घरातून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबियांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लापता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे भरत जैन हे मुंब्रा रेतीबंदर परिसरात कशासाठी गेले होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच ही हत्या आहे की आत्महत्या हेही अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत शवविच्छेदानंतर खुलासा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज हस्तगत केले आहे.
हेही वाचा - नांदेडमधील 'मराठा मूक आंदोलन' भाजपा प्रणित - अशोक चव्हाण