ठाणे - कोरोनामुळे लॉकडाऊन आणि त्यामुळे लागणाऱ्या निर्बंधांमुळे लग्न सोहळ्यावर बंधने आली आहेत. कमी नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे उरकावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर डोंबिवली नगरीत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात वधू वर चक्क सात समुद्रा पार कॅनडाला होते. मात्र, वराच्या वडिलांनी पुढाकार घेत डोंबिवलीहून भटजीच्या मदतीने, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने आपल्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला.
हेही वाचा - धक्कादायक! ठाण्यात एकाच महिलेचे तब्बल तीनवेळा लसीकरण
कॅनडात स्थायिक झाला अन लग्न जुळलं...
डोंबिवली पूर्वेकडील भोपर गाव परिसरात राहणाऱ्या डॉ. हिरामन चौधरी यांच्या मुलगा भूषण याला ७ वर्षांपूर्वी कॅनेडात नोकरी लागली. तो तेथेच स्थायिक झाला. यादरम्यान, त्याचे मनजीत कौर या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही आपल्या कुटुंबांना विवाहाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. दोघांच्याही कुटुंबांनी विवाहास सहमती दिली, मात्र २०२० पासून भारतात लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यामुळे त्यांना भारतात येणे अशक्य झाले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनादेखील कॅनडाला जाता येत नव्हते.
दोन वर्षांपासून लग्न सोहळ्याची होती तयारी, मात्र..
फोनवर लग्नाबद्दल बोलणी व्हायची, मात्र कोरोनामुळे लागलेला लॉकडाऊन व निर्बंध यामुळे दोन वर्षांपासून तारीख निश्चित होत नव्हती. अखेर या दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलांचा ऑनलाईन विवाह करण्याचे ठरवले. त्यानुसार कुटुंबांनी तयार सुरू केली. लग्नासाठी लागणारे सर्व सामान कुरियरच्या माध्यमातून भूषणला कॅनडा येथे घरपोच करण्यात आले. त्यानंतर ठरलेल्या मुहूर्तावर चौधरी कुटुंबाच्या डोंबिवली येथील घरी भटजी आले. विवाह ऑनलाईन होणार असल्याने नातेवाईकांची गर्दी नव्हती. भटजींनी कॅनडा येथे असलेल्या भूषण व हरदीप यांना ऑनलाईन लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून लग्नाचे विधी सांगत त्या प्रमाणे ते करवून घेतले. अखेर कॅनडा येथे राहत असलेल्या भूषण व हरदीपचा डोंबिवली येथून ऑनलाईन विवाह संपन्न झाला.
ऑनलाईनच आशीर्वाद अन ऑनलाईनच अक्षदा...
यावेळी विवाह सोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावलेल्या नातेवाइकांनी व चौधरी कुटुंबाच्या मित्रपरिवाराने नववधू, वराला ऑनलाईनच आशीर्वाद दिले. अक्षदा देखील ऑनलाईनच टाकल्या. या लग्नानंतर वराचे वडील डॉ. हिरामन चौधरी यांनी या विवाह सोहळ्याबद्दल आंनद व्यक्त केला. आणि कोरोना काळात अशाच पद्धतीने विवाह सोहळा करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - ठाण्यात कोरोना नियमांच्या उल्लंघन प्रकरणी लॉजवर पोलिसांची कारवाई