ठाणे - डोंबिवलीत १८ मार्च रोजी झालेला हळदी समारंभ आणि १९ मार्च रोजी झालेल्या विवाह सोहळ्यात कोरोनाग्रस्त रुग्ण सहभागी झाला होता. या कोरोनाग्रस्तामुळे अनेक जणांना कोरोनाची लागण झाली असून हा विवाह सोहळा कल्याण डोंबिवलीकरांच्या आरोग्यासाठी धोक्याचा ठरला आहे. याच विवाह सोहळ्याला परवानगी दिल्याप्रकरणी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, या प्रकाणातील संबधित मालमत्ता विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांना सोडून प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना बळीचा बकरा बनविला असल्याची चर्चा रंगली असून स्थानिक पोलिसांवरदेखील कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना मुंबईत या रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबई पाठोपाठ कल्याण - डोंबिवली कोरोना रुग्णांच्या संख्येत अव्वल आहे.
कल्याण डोंबिवलीतील रुग्णसंख्या वाढण्यामागे १९ मार्च रोजी डोंबिवली येथे पार पडलेला विवाह सोहळा कारणीभूत असून या विवाह सोहळ्यात तुर्की येथून आलेला कोरोनाग्रस्त रुग्ण सहभागी झाला होता. या रुग्णाच्या संपर्कात अनेक जण आल्याने अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर या विवाह सोहळ्याला कल्याण डोंबिवलीच्या महापौरांसह इतर अनेक राजकारण्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी आणि पालिकेच्या मालमत्ता विभागाने वेळीच या लग्न समारंभाला परवानगी नाकारली असती तर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसता अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
हे प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांनी आपल्यावरील जबाबदारी ढकलण्यासाठी आयोजकांवर गुन्हे दाखल केल्याचे बोलले जात आहे. तर पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या विवाह सोहळ्याला ‘ह’ प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांना जबाबदार धरत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, पालिकेची मैदाने हे मालमत्ता विभागाच्या अंतर्गत येत असल्याने मालमत्ता विभागातील बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही ? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.