ठाणे - डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील मेट्रोपॉलीटन एक्झीमकेम प्रा.लि कंपनीला मंगळवारी लागलेली भीषण आग २४ तासांनंतर आटोक्यात आणण्यात अग्निमशन दलाच्या जवानांना यश आले आहे. मात्र, या आगीमुळे संपूर्ण कंपनी बेचिराख होवून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या या ठिकाणी कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
मेट्रोपॉलीटन एक्झीमकेम प्रा.लि कंपनीत डाईंग इंटरमिडीएट व स्पेशालिटी केमिकल्सचे उत्पादन करण्यात येत होते. कंपनीच्या स्टोअर रुममध्ये साठवून ठेवलेल्या ज्वालाग्रही रसायन साठ्याला मंगळवारी दुपारी १२.४५ वाजता आग लागली होती. त्याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी प्रथम आग पाहिली असता, त्यांनी तत्काळ कंपनीतील उपलब्ध असलेल्या अग्निशामक उपकरणाच्या मदतीने आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र, आग नियंत्रणात न आल्याने ती कंपनीच्या स्टोअरमध्ये सर्वत्र पसरली. त्यामुळे स्टोअरमधील ज्वालाग्रही (सॉल्व्हंट) रसायनांचे शेकडो ड्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्याला भीषण आग लागली.
त्यानंतर ज्वालाग्रही रसायन भरलले ड्रम फुटल्याने ही आग संपूर्ण कंपनीत पसरली. या दरम्यान कंपनीतील सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात येऊन एम.आय.डी.सी. डोंबिवली अग्निशमन दलाशी संपर्क साधून आगीची माहिती दिली. माहिती मिळताच कल्याण - डोंबिवलीच्या अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, आगीचे स्वरूप अधिक वाढल्याने अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, भिवंडी येथील अग्निशमन दल घटनास्थळी येऊन आग विझवण्यास सुरुवात केली होती. मात्र, आग कंपनीत जलदगतीने पसरल्याने सॉल्व्हंटचे ड्रम आणि रसायने असलेली रिअॅक्टर्स यामध्ये उष्णतेमुळे जवळपास ५० स्फोट झाले होते. या स्फोटांमुळे लगतच्या इतर कारखान्यांना आगीची झळ लागली होती. तर, भीषण आगीचे स्वरुप पाहता काही वेळेनंतर शेजारी असणाऱ्या कारखान्यांमधील कामगारांना तसेच नागरिवस्ती व शाळेतील मुलांना सुरक्षित अंतरावर जाण्याचा स्थानिक पोलिसांनी सूचना देत, हा परिसर रिकामा करण्यात आला होता. आज सकाळच्या सुमारास रासायनिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल होवून शिल्लक रसायनाच्या साठ्याची पाहणी करून जमिनीखालील ज्वालाग्रही रसायनांची टाकी व ओलियम या रसायनाची जमिनीवरील टाकी आणि त्यामधील रसायने सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली होती.
दरम्यान, डोंबिवली एमआयडीसीमधील घातक रसायनांचे कारखाने सुरू ठेवून भोपाळसारख्या दुर्घटनेची वाट पाहता का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंधरा दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने येथील धोकादायक व अतिधोकादायक कंपन्यांचे सर्वेक्षण सुरू असतानाच मेट्रोपॉलिटन एक्झिम केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र, हा केवळ अपघात असल्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुन्हा चौकशी करा, भाजपची मागणी
आरोपीला गांजा देणारा मित्रच झाला आरोपी... अकोल्यातील अजब गुन्हेगारी