ठाणे - आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यातील माजिवडा येथे ठाण्यातील पहिले मराठा विद्यार्थी वस्तीग्रहाचा लोकार्पण सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. दरम्यान, येथे मराठा समन्वयकामध्ये आपापसात वाद सुरू झाला. चळवळीत ज्यांचे योगदान नाही, कोणतेच काम केले नाही अशांचे नाव या ठिकाणी घेऊ नये, यासाठी समन्वयक रमेश आंब्रे संतापल्याचे समोर आले आहे. त्यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी समन्वयक रमेश आंब्रे यांना शांत राहण्यास सांगितले.
'शांत रहा गोंधळ करू नका'
मराठा समाजाने अनेक शांततेत मोर्चे काढले आहेत. त्याची एकजूट मराठा समाजाला न्याय मिळवून देईल. त्यामुळे शांत रहा गोंधळ करू नका असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले. आज मराठा विद्यार्थी वस्तीगृह लोकार्पण सोहळयात जो गोंधळ उडाला त्याबाबत असे होऊ नये. तसेच, ज्या मराठा चळवळीत ज्यांचे योगदान नाही अशांचे नावे या ठिकाणी घोषित करणे चुकीचे आहे. त्यामुळे समन्वयकातील काहींना मी खडसावले. कुठेही आमच्यात फूट पडू नये सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचे, स्पष्टीकरण रमेश आंबरे यांनी दिले.