ठाणे - डोंबिवली जिमखाना येथे आयोजित एका फेस्टिवलमध्ये सत्येंद्र जोग यांनी 'विश्वविक्रमी बटाटावडा' हा उपक्रम हाती घेतला आहे. शंभर सहकाऱ्यांना सोबत घेऊन पंचवीस हजार बटाटेवडे तळण्याचा त्यांचा मानस आहे. या उपक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होणार आहे.
यासाठी 1500 किलो बटाटे, 500 किलो गोडेतेल तसेच अन्य साहित्याचा वापर होणार आहे. पहिल्यांदाच हा विश्वविक्रमी बटाटावडा उपक्रम हाती घेतल्याचे शेफ जोग यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. मराठमोळ्या बटाटावड्याला जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त होण्यासाठी संबंधित उपक्रम हाती घेतला आहे, असे ते म्हणाले. हा उपक्रम आज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार असून सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत 16 हजार बटाटेवडे तळून झाले आहेत. डोंबिवलीचा बटाटा वडा आणि सत्येंद्र जोग अशी ओळख संपूर्ण जगभर व्हावी, अशी आशा आयोजक राहुल कामत यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : सूर्यग्रहण पाहण्यासाठी ठाण्यात नागरिकांची गर्दी; विशेष चष्म्यातून घेतला आनंद
बटाटेवडे तळून झाल्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि संस्थांना मोफत वाटण्यात येणार आहेत. यामध्ये वीटभट्टीवर काम करणारे मजूर, रस्त्यावर राहणारे विद्यार्थी आणि दुर्गम भागातील आदिवासी तसेच गरजूंना मोफत वाटण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.