ठाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समजल्या जाणाऱ्या ड्रीम प्रोजेक्टपैकी बुलेट ट्रेनचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी पटलावर आला होता. मात्र वेळेअभावी महासभा तहकूब झाल्याने चौथ्यांदा येणारा हा प्रस्ताव अखेर लांबणीवर गेला आहे. दरम्यान, येत्या मंगळवारी हा प्रस्ताव पुन्हा येणार असून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये खडाजंगी होणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या या प्रस्तावाचे नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रस्ताव चौथ्यांदा महासभेच्या पटलावर
आज महासभेत बुलेट ट्रेनचा प्रस्ताव चौथ्यांदा महासभेच्या पटलावर येणार होता. मात्र वेळच्या अभावी महासभा तहकूब झाल्याने बुलेट ट्रेनचा विषय चौथ्यांदा बारगळला. आता हा प्रश्न मंगळवारी होणाऱ्या महासभेत चर्चिला जाणार आहे. अनेकवेळा लांबणीवर पडलेला बुलेट ट्रेन प्रश्न हे मुंबईच्या कारशेडला केंद्रातून होणारी चालढकलीचे फलित तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कदाचित मंगळवारी होणाऱ्या महासभेत शिवसेना बुलेट ट्रेनसंबंधी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.
मनसे आणि ग्रामस्थांनी दर्शविला होता विरोध
बुलेट ट्रेनला लागणाऱ्या जागा संपादनाच्या वेळी दिवा येथे मनसे आणि ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र बुलेट ट्रेनसाठी मौजे शीळ येथील सर्व्हे क्र ६७/ब/५ हा भूखंड हवा आहे. सादर भूखंडाचे क्षेत्रफळ ३८४९. ०० चौरस मीटर असून मंजूर विकास आराखड्यातील रस्त्याखालील क्षेत्राचा मोबदला आकारून सदरची जागा ही नेशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन (बुलेट ट्रेन)साठी वापरात आणण्याची अनुमती देण्याचा विषय हा महासभेत पटलावर होता. मात्र सत्ताधारी शिवसेना असलेल्या ठाणे पालिकेच्या गोषवाऱ्यात तो लावण्यात आला. अखेर वेळेअभावी त्यावर चर्चाच झाली नाही. आता मंगळवारी होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीच्या वेळेस सभागृहात भाजपा-शिवसेना क्रमाने समोर येण्याची शक्यता वाढलेली आहे.