ठाणे : कोरोनावर प्रभावी मानले जाणारे रेमडेसीवीर इंजेक्शचा काळा बाजार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. 3 हजाराचे रेमडेसीवीर इंजेक्शन 25 हजार रुपयांना तर, अॅक्टेमरा इंजेक्शन तब्बल 80 हजार रुपये किमतीत ही टोळी विकत होती. या टोळीला या औषधांचा पुरवठा करणाऱ्या जैन नामक म्होरक्याच्या मागावर पोलीस आहेत.
राज्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. असे असताना बाजारात नागरिकांची दिशाबूल करत त्यांची लूट केली जात आहे. कोरोनावर सध्या कोणतेही औषध नाही. तरी देखील सध्या रेमडेसिवीर हे औषध कोरोना रुग्णांवर प्रभावी मानले जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनला बाजारात मोठी मागणी आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा कहर.! दिवसभरात तब्बल १० हजार ५७६ नव्या रुग्णांची नोंद
या इंजेक्शनची बाजारात किंमत ही 3 त 5 हजार रुपये इतकी आहे. मात्र, काही भामटे सध्याच्या परिस्थितीचा फायदा उचलून या इंजेक्शनचा काळाबाजार करत आहेत. ठाण्यात काही जण या इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास तिन पेट्रोल पंप, नौपाडा, ठाणे येथे सापळा रचुन इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तीन व्यक्तींना अटक केली. त्यानंतर या तिघांच्या चौकशीतून अन्य दोघांची नावे समोर आली. त्या दोघांना देखील पोलिसांनी नवी मुंबईच्या कामोठे येथून बेड्या ठोकल्या.
अरुण रामजी सिंग (35, घाटकोपर), सुधाकर शोभीत गिरी (37, खार पूर्व, मुंबई), रवींद्र मोहन शिंदे (35, कोपरखैरणे, नवी मुंबई), वसीम अहमद अब्दुल अहमद शेख (32, कामोठे, नवी मुंबई), अमिताब निर्मल दास (39, कामोठे, नवी मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेतल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी रेमडेसीवीर आणि टोसिलिजुमैब (अॅक्टेमरा) ही दोन्ही इंजेक्शन तसेच, कॅन्सर, गर्भपात करण्याची औषधे, मोबाईल फोन आणि एक कार असा 5 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने सुनावली आहे.