ठाणे - चिंकू पठाणचे ड्रग्स रॅकेटच कनेक्शन उघड करण्यात एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांना यश आले होते. या ड्रग्स रॅकेटचे कनेक्शन जानेवारी २०२१ रोजी भिवंडीतही असल्याने भिवंडीतील विक्की जैन या सराफासह शहरातील पद्मानगर भागात राहणाऱ्या रोहित वर्माला एनसीबीने अटक केली होती. पाठोपाठ १७ जून २०२१ रोजी एनसीबीच्या पथकाने पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भिवंडी - पडघा मार्गावर सबीर शेख आणि निजामुद्दीन ताजा या दोघा तस्करांना १२ किलो चरससह अटक केली होती. याप्रकरणी अटक आरोपींनी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याचे चौकशी दरम्यान नाव घेतले होते. यानंतर भिवंडीतील ड्रग्स रॅकेट कनेक्शनमध्ये इकबाल कासकरचा सहभाग असल्याचे समोर आले. त्याला आज ठाणे कारागृहातून थेट भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
इकबाल कासकरला बुधवारी एनसीबीने केली अटक-
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला बुधवारी मुंबई अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अटक केली. इकबाल कासकरला ड्रग्ज प्रकरणात प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात आलं आहे. अलीकडेच एनसीबीने चरसांच्या दोन वस्तू पकडल्या होत्या, ज्या पंजाबमधील लोक काश्मीरहून दुचाकीवरून मुंबईला आणत असत. या प्रकरणात सुमारे 12 किलो चरस पकडण्यात आले होते.
दहशतवाद फंडिंग आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन -
एनसीबीला अंडरवर्ल्डशी कनेक्शन मिळून आल्याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरचा ताबा एनसीबीने घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, एनसीबीला ड्रग्स पुरवठा करण्यासाठी दहशतवाद फंडिंग आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती सापडली होती. त्याआधारे एनसीबीने मुंबईतही अनेक ठिकाणी छापे टाकले. अटक केलेल्या आरोपींची चौकशी आणि चरस पुरवठा करण्याचे कनेक्शन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याकडे सापडल्याने एनसीबीने ठाणे कारागृहात बंद असलेल्या इकबाल कासकरची रिमांड घेण्यासाठी आज त्याला भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात व बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ड्रग्स विकून पैसे दाऊदच्या खिशात -
दाऊदचे हस्तक मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स विकून ते पैसे दाऊदला पाठवत होते. हवाला मार्गे कोट्यवधीची रक्कम मुंबईबाहेर पाठवत होता. गेल्या ५ वर्षांमध्ये या तस्कारांनी १५०० कोटींचे ड्रग्स विकले होते, हा पैसा दाऊदकडे पोहोचल्यानंतर तो दहशतवाद्यांना कारवाया करण्यासाठी पुरवत होता, अशी खळबळजनक माहिती उघड झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.