ठाणे - बंटी - बबलीच्या जोडीने नाशिकच्या व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी बंटीला अटक केली असून बबली अद्यापही फरार आहे. सुनील जेठयानी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर ज्योती जेठयानी असे फरार असलेल्या बबलीचे नाव आहे.
खळबळजनक बाब म्हणजे अटक बंटीवर पवई, शीळ डायघर, एमआयडीसी अंधेरी, मध्यवर्ती उल्हानसागर, आणि हरियाणा मधील गुडगांव अश्या ५ पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे तर महात्मा फुले, कल्याण पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हाही दाखल आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ३२ हजार रुपयांचे ७ विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल आणि त्यामधील १६ सिमकार्ड तसेच ९ विविध कंपन्यांची एटीएम कार्ड हस्तगस्त केली आहेत. त्याच्या विरुद्ध मुंबई न्यायालयात ४ दावे प्रलंबित आहे. विशेष म्हणजे बंटी बबली या चित्रपटाला शोभेल असे दृश्य निर्माण करून तो नागरिकांना गंडा घालून त्या पैश्याने मौजमजा करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा - मुंबई- नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत पादचारी ठार
उल्हासनगर येथे राहणारे आरोपी सुनील जेठयानी, ज्योती जेठयानी या बंटी - बबलीच्या जोडीने नाशिक येथे राहणारे प्रवीण उशीर यांना कल्याण कोर्ट परिसरात 19 नोव्हेंबरला बँकेच्या लिलावमधून खरेदी केलेले डंपर, पोकलेन, ट्रॅक्टर स्वस्त दरात देतो, फायनान्स देखील उपलब्ध करून देतो, असे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडत प्रवीण यांनी या दोघांना तब्बल 14 लाख 30 हजार रुपये दिले. मात्र, महिनाभराचा कालावधी उलटला, तरीही मशिनरी न दिल्याने प्रवीण यांना संशय आला. त्यांनतर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनील आणि ज्योती जेठयानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला होता.
हेही वाचा - मुलाच्या वाढदिवसावरून वाद; पत्नीने पतीच्या डोक्यात फ्राय पॅन मारून सुरीने केले वार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस नीरीक्षक दीपक सरोदे, साहायक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस हावालदार जे. के. शिंदे, भालेराव, पोलीस नाईक सुनील भोईर, शिर्के, निकाळे, चौधरी, संदीप भोईर आदींच्या पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपी ज्योती फरार असून तिचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी सांगितले.