ठाणे - गेल्या दीड वर्षांपासून महापालिकांच्या ठेकदारांना बिलाची रक्कम देण्यात आली नसल्याने लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. सोमवारी काही ठेकेदारांनी ठाणे महापालिका मुख्यालयातच ठिय्या आंदोलन केले. केलेल्या कामांचे बिल मिळणार नसेल तर या लॉकडाऊनच्या काळात जगणे देखील कठीण झाले असून एक तर आत्महत्या करावी लागेल नाही तर गुन्हेगार बनावे लागेल, अशी वेळ आमच्यावर आली असल्याची शोकांतिका उपोषणाला बसलेल्या ठेकेदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत विविध प्रकारची सिव्हिल वर्कची कामे करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली असून या ठेकेदारांना कामाच्या मोबदल्यात बिले दिली जातात. मात्र, गेल्या एक ते दीड वर्षांपासून या ठेकेदारांना ठाणे महापालिकेकडून बिलाची रक्कम देण्यात आली नसल्याने आता लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी वीरेंद्र पंडित नामक ठेकेदाराने थेट पालिका मुख्यालयातच आमरण उपोषण सुरू केले आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्य लेखा तसेच वित्त अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर हे आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनाची दखल घेण्यास नगर अभियंता आणि वित्त अधिकाऱ्यांना देखील वेळ नसल्याचा आरोप पंडित यांनी केला आहे.
जी कामे केली त्याचीच देयके मागत असून आता खरी गरज असताना जर देयके मिळणार नसतील तर करायचे काय असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. नगर अभियंत्यांकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही नगर अभियंता वित्त अधिकाऱ्यांकडून बजेट आले नसल्याचे कारण देत आहेत. त्यामुळे आता एक तर आत्महत्या करू किंवा गुन्हेगार होण्याची आमच्यावर वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात ठाणे महापालिकेचे संपूर्ण उत्पन्नच बंद झाल्याने या ठेकेदारांची देयके कशी देणार असा प्रश्न ठाणे महापालिकेला पडला आहे. मार्चपर्यंत आमच्याकडून अत्यावश्यक कामे करून घेण्यात आली. जर महापालिकेकडे बिल देण्यासाठी पुरेसा निधी नव्हता तर मग आमच्याकडून कामे करूनच का घेतली असा प्रश्न आता ठेकेदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.