ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटातील हॉटेल शिवनेरी समोर धावत्या ट्रकमध्ये अचानक पेट घेऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबईहुन नाशिकच्या दिशेने जाणारी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
ट्रक चालकाने काढला पळ -
मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात आज सकाळच्या सुमारास लोखंडी सळईने भरलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. हा ट्रक मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असतानाच अचानक ट्रकने मागच्या बाजूने पेट घेतला. तर ट्रकला आग लागताच चालकाने ट्रक थांबवत त्यामधून पळ काढला. मात्र या घटनेमुळे महामार्गावरील नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज -
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल व महिंद्रा कंपनीचे अग्निशमन दल दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक व महामार्ग पोलिसांनी वेळीच मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून या दुर्घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.