नवी मुंबई - नेरुळ परिसरातील शैलेश टॉवर या इमारतीच्या रंगकामासाठी तयार करण्यात आलेला बांबूचा स्ट्रक्चर अचानक कोसळला. या घटनेत 14 कामगार जखमी झाले आहेत. दरम्यान, कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षेसाठी साधने न दिल्याने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश टॉवरमध्ये सुरू होते काम
नवी मुंबईतील नेरुळमधील शैलेश टॉवर या इमारतीत रंगकाम व वॉटर प्रूफिंगचे काम सुरू होते. या कामासाठी परांची उभारल्या होत्या व या कामासाठी 20 पेक्षा अधिक कामगार काम करीत होते. त्यातील 14 कामगार हे परांचीवर बसून काम करीत होते. बुधवारी शैलश टॉवरमधील रंगकाम पूर्ण झाल्यावर परांची सोडण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावरील बांबूंची परांची तुटली. परांचीवर काम करत असलेले कामगार खाली पडले. या अपघातात 14 कामगार जखमी झाले आहेत. यातील 2 कामगार गंभीर जखमी आहेत. त्यांना जवळच असणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परांचीवर अडकलेल्या कामगारांना स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
जखमी कामगारांची नावे
रियाद अली (40), युसुफ अली (45), मोहम्मद मुताफीक (24), आतिकुर रेहमान (31), अबू अली (27), नशीदूर रेहमान (31), अबू बकर सिद्धीकी (32), मूजीबुर रेहमान (32), नूर अली (23), मुफिजूर रेहमान यांच्यासह आणखी चार जण जखमी झाले आहेत. त्यांना नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात दोघांची स्थिती गंभीर असून त्यांना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.
ठेकेदाराने कोणतेही सुरक्षा साहित्य न पुरविल्याने गुन्हा दाखल -
शैलेश टॉवरमध्ये सुरू असलेले रंगकाम व वॉटर प्रूफिंगच्या कामाचा कंत्राट दिलेल्या ठेकेदाराने या कामगारांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य पुरविले नव्हते. त्यामुळे बांबूच्या परांची कोसळल्याने कामगार जखमी झाले. याप्रकरणी कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार संतोष रामटेके याच्याविरुद्ध नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडून विचारपूस
हेही वाचा - दिग्विजय सिंह यांच्या विरोधात काँग्रेस सदस्याची सोनिया गांधींकडे पत्राद्वारे तक्रार