सोलापूर - शहरातील गोकुळ सोसायटीत राहणाऱ्या एका पिग्मी एजंटच्या घरी मोठी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने 4 लाख 85 हजार रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला आहे. यासंबंधी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. संतोष नामदेव वाघमारे(वय 45) यांनी 27 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे.
26 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 ते पहाटे 4.30 च्या सुमारास संतोष वाघमारे यांनी गौरी लक्ष्मी असल्याने घराचे दार पूर्णत: लावले न्हवते. यावेळी ते हॉलमध्ये झोपले होते. चोरट्यांनी हीच संधी साधली. या दरम्यान अज्ञात चोरट्याने अलगत घरात प्रवेश केला; आणि कपाटातील दागिन्यांवर डल्ला मारला.
या चोरीत 2 लाख 70 हजार रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या, 1 लाख 80 हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या, 15 हजार रुपयांच्या सोन्याच्या कानातले, 15 हजार रुपयांची चांदीची लक्ष्मी मूर्ती, गणपती मूर्ती, व 5 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज व रोख रक्कम लंपास झाली आहे.
चोरीची घटना कळताच विजापुर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. बोटांचे ठसे घेतले. श्वान पथक दाखल केले. तसेच अन्य बाबींचा तपास केला. घटनास्थळी पंचनामा करून दुपारी 2 च्या सुमारास विजापूर नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.
वाढत्या चोऱ्यांचे सत्र कधी थांबणार?
सोलापूर शहरात चोऱ्या वाढल्या आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज शहराच्या विविध पोलीस ठाण्यात चोरींचे गुन्हे नोंद होत आहेत. चोरट्यांचा वाढलेला सुळसुळाट लवकरात लवकर कमी करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.