सोलापूर - सोलापूर शहराला शोलापूर या नावाने ओळखले जात होते, कारण येथील जनतेने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले आहे. 1930 रोजी सोलापूर शहराचे नाव लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गेले होते. या शहरामुळे ब्रिटिश साम्राज्य टिकेल की नाही, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे, 12 जानेवारी 1930 पासून 18 जून 1930 असे तब्बल 49 दिवस सोलापुरात मार्शल लॉ हा कायदा लागू करण्यात आला होता. इंग्रजांच्या 150 वर्षांच्या कारकिर्दीत देशातील एकमेव शहरात मार्शल लॉ लागू करण्यात आला होता. तरीही सोलापूरला राष्ट्रीय पातळीवर म्हणावे तसे मान सन्मान मिळत नाही.
हेही वाचा - पंढरपुरातील व्यापाऱ्यांचे संचारबंदी विरोधातील आंदोलन माघारी
टिळक युगा नंतर महात्मा गांधी यांचा काळ सुरू झाला. सोलापुरातील अनेक कामगार नेते, डावे उजवे विचारसरणीचे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करून भारतीय स्वातंत्र्याचा लढा लढत होते. मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले होते. सोलापुरातील स्वातंत्र्य सेनानींनी आणि नागरिकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. त्यामध्ये जगन्नाथ शिंदे, मलप्पा धनशेट्टी, रसूल कुर्बान हुसेन, श्रीकिसन सारडा यांचा देखील मोठा सहभाग होता. मोठे आंदोलन करून 8, 9 आणि 10 मे 1930 असे तीन दिवस सोलापुरातील सर्व इंग्रजांना पिटाळून लावले होते. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर 1930 साली तीन दिवस सोलापूर शहराला स्वातंत्र्याचा अनुभव आला होता. यानंतर इंग्रजांनी मार्शल लॉ लष्करी कायद्याचा उपयोग करून श्रीकिसन सारडा, मलप्पा धनशेट्टी, रसूल कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना 12 जानेवारी 1931 रोजी पूणे येथील येरवडा कारागृहात फासावर लटकविले. देशासाठी या चार जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तरी देखील भारतात राष्ट्रीय पातळीवर म्हणावे तसे यांना किंवा सोलापूरला म्हणावे तसे मान सन्मान मिळत नाही, अशी खंत येथील इतिहास अभ्यासक, समाजसेवक अनेक वर्षांपासून व्यक्त करत आहेत.
गांधीजींच्या सत्याग्रहाला सोलापुरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
महात्मा गांधी यांनी देश पातळीवर सत्याग्रह सुरू केला होता. या आंदोलनाला सोलापुरातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत होता. अहिंसेच्या मार्गातून इंग्रजांना विरोध केला जात होता. सोलापुरातील बहुतांश नागरीक हे गिरणी कामगार होते. अहिंसेच्या माध्यमातून मोर्चे, सभा, संमेलने सुरू होती. 8 मे 1930 रोजी रूपा भवानी मंदिराकडे मोर्चा निघाला होता. या ठिकाणी इंग्रजांसाठी राखीव अशी शिंदीची झाडे आणि दारूचे गुत्ते होते. ते दारूचे गुत्ते फोडण्यासाठी आणि शिंदीची झाडे तोडण्यासाठी हा मोर्चा निघाला होता. पण, गांधीजींच्या आंदोलनात जमनालाल बजाज आणि वीर नरिमन यांना इंग्रजांनी अटक केली आहे, अशी वार्ता सोलापुरात वाऱ्यासारखी पसरली आणि शांतपणे निघालेल्या मोर्चाने आक्रमक रूप धारण केले. यावेळी ब्रिटीश कलेक्टर नाईट यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले होते. पण, जामव शांत होत नव्हता, शेवटी इंग्रजांच्या एका पोलीस अधिकाऱ्याने शंकर शिवदारे यावर गोळी झाडली आणि तो धारातीर्थी पडला. हे बघून मोर्चेकऱ्यांच्या सहनशीलतेचे बांध फुटला आणि त्यांनी देखील हल्ला चढविला. इंग्रज पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी हे घटनास्थळावरून निघून गेले होते.
इंग्रजांच्या कार्यालवर ताबा मिळवला -
रूपा भवानी येथून खवळलेल्या मोर्चेकऱ्यांनी मंगळवार पेठ पोलीस चौकी गाठली आणि उपस्थित असलेल्या 12 पोलिसांपैकी एकाला जाळले आणि तीन पोलिसांना बेदम मारहाण केली. बाकीचे इंग्रज पोलिसांना हाकलून लावले. त्यानंतर आंदोलनंकर्त्यांनी नवी पेठ येथील इंग्रजी हुकूमत असलेली नगरपालिका ताब्यात घेतली आणि रामकृष्ण जाजू यांना नगराध्यक्ष घोषित करून पूढे निघाले. त्यानंतर आक्रमक झालेले आंदोलक सोलापूर येथील जिल्हा न्यायालयात आले आणि कोर्टाचा पूर्ण ताबा घेतला आणि इंग्रजांच्या कागदांची होळी केली. 8,9 आणि 10 मे 1930 असे तीन दिवस सोलापुरात एकसुद्धा इंग्रज उपस्थित नव्हता. 1930 साली सोलापुरातील जनतेने स्वातंत्र्याचा अनुभव घेतला होता.
लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोलापुराचे नाव -
रशियाच्या एका रेडिओ वृत्त वाहिनेने सोलापुरातील झालेल्या घटनेबाबत रेडिओवरून माहिती दिली. आणि लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोलापूर शहरात झालेल्या घटनेबाबत चर्चा करण्यात आली. सोलापूर शहरामुळे ब्रिटिश साम्राज्य टिकेल का नाही, अशी देखील चर्चा झाल्याची माहिती इतिहास अभ्यासक सांगतात आणि लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोलापुरात मार्शल लॉ किंवा लष्करी कायदा लावावा, असा निर्णय झाला आणि हुबळी आणि गुलबर्गा येथून ब्रिटिश सैन्याला सोलापुरात दाखल होण्याचा आदेश देण्यात आला.
मार्शल लॉ म्हणजे त्यावेळी इंग्रजांचे लॉकडाऊन
इंग्रजांनी भारतात जवळपास 150 वर्षे राज्य केले. या कालखंडात इंग्रजांनी भारतातील कोणत्याही शहरात किंवा जिल्ह्यात मार्शल लॉ किंवा लष्करी कायदा लावला नव्हता. फक्त एकमेव अशा सोलापुरात हा कायदा लावून येथील जनतेवर अमानुष असे अत्याचार करण्यात आले. तब्बल 49 दिवस मार्शल लॉ सुरू होता. 11 मे 1930 रोजी सुरू झालेला लष्करी कायदा/मार्शल लॉ 18 जून 1930 रोजी संपुष्टात आला. या काळात ब्रिटिश सैन्याला पूर्ण अधिकार देण्यात आले होते. दिसता क्षणी गोळी घालण्याचा आदेश देण्यात आला होता. म्हणजे सोलापुरातील इतिहासात 1930 रोजी लॉकडाऊन होते, असे म्हंटले जाते.
प्रत्येक समाजातील एका नेत्याला अटक करून फासावर लटकविले
इंग्रज हे सूडबुद्धीचे होते, असे अनेक इतिहास तज्ज्ञ म्हणतात. त्याचे उदाहरण पाहिले तर इंग्रजांनी 1930 रोजी मार्शल लॉच्या वेळी त्यांनी सोलापुरातील प्रत्येक समाजातील एका नेत्याला अटक केले. मुस्लीम समाजातील रसूल कुर्बान हुसेन, मराठा समाजातील जगन्नाथ शिंदे, लिंगायत समाजातील मलप्पा धनशेट्टी, प्रसिद्ध व्यापारी श्रीकिसन सारडा यांना अटक करून त्यांचे हालहाल करून त्यांवर दंगा करणे, खून, लूट असे आरोप ठेवण्यात आले आणि त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली. वर्षभर या चौघा स्वातंत्र्य सैनिकांवर खटला चालवण्यात आला आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 12 जानेवारी 1931 रोजी जगन्नाथ शिंदे, रसूल कुर्बान हुसेन, मलप्पा धनशेट्टी आणि श्रीकिसन सारडा यांना फाशी देण्यात आली.
12 जानेवारीला फाशी का दिली
49 दिवसांच्या मार्शल लॉ नंतर काही दिवसांनंतर सोलापुरात ब्रिटिश पुन्हा बळकट झाले. पुणे येथील न्यायालयात सोलापूरच्या चार हुतात्म्यांना फाशीची शिक्षा झाली होती. फाशी अगोदर त्यांनी महात्मा गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, ती इच्छा इंग्रजांनी पूर्ण केली नाही आणि 12 जानेवारी रोजी चार जणांना फासावर लटकविले. सोलापुरात जानेवारी महिन्यात ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची मोठी जत्रा भरते, मनाच्या काठ्यांची मिरवणूक काढली जाते. यावेळी सोलापुरात मोठे आनंदाचे वातावरण असते. अशा आनंददायी वातावरणामध्ये दुःखाचे विघ्न घालण्यासाठी 12 जानेवारी 1931 रोजी जगन्नाथ शिंदे, रसूल कुर्बान हुसेन, मलप्पा धनशेट्टी आणि श्रीकिसन सारडा यांना फाशी देण्यात आली. म्हणजे इंग्रजांनी सोलापूर शहरात 12 जानेवारी 1930 रोजी दुःखाचे वातावरण निर्माण केले होते आणि मकर संक्रांतीसारखे मोठे सण साजरा करू नये, अशी इंग्रजांची इच्छा होती.
चार हुतात्म्यांना राष्ट्रीय पातळीवर मान सन्मान नाहीच
सोलापूर शहरातील हे चार हुतात्मे देशासाठी लढले आणि फासावर चढले. पण, या चार हुतात्म्यांना आजही देशपातळीवर मोठा मान सन्मान मिळाला नाही. पाठ्यपुस्तकांत यांचे धडे नाहीत. देशासाठी लढलेले देशपातळीवर वंचित आहेत. लंडनच्या इतिहास सोलापूर शहराची नोंद होते, पण भारताच्या राष्ट्रीय इतिहासात सोलापूर शहराची सुवर्ण अक्षरांनी नोंद होत नाही, हे सोलापूरकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
हेही वाचा - Nag Panchami: सापाचा दूध पिल्याने मृत्यू होतो - सर्प अभ्यासक राहुल शिंदे