सोलापूर - वाहन उद्योगातील मारुतीपासून बीएमडब्ल्यू अशा अनेक कंपन्यांना सोलापूरातील प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड ही कंपनी सुट्टे भाग पुरविते. या कंपनीच्या एकूण व्यवसायात मार्च २०१९ अखेरीस ५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा एकूण व्यवसाय आता ७१२ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. अमेरिकी चलनामध्ये ही रक्कम १०० मिलियन डॉलर्सपेक्षाही अधिक आहे.
प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड ही १९९२ साली केवळ १२०० स्क्वेअर फूटाच्या जागेत ही कंपनी सुरू झाली. अनेक आव्हानांचा सामना करत, नवनवे विक्रम रचत २०१७-१८ मध्ये कंपनीचा व्यवसाय ४५३ कोटींवर पोहोचला. १९९२ साली प्रिसिजनचे केवळ ६ कर्मचारी होते. आता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर्मचार्यांची संख्या २ हजार ५०० पेक्षाही अधिक झाली आहे. युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया या खंडांमधील २१ देशांमधील ग्राहकांना १२ पेक्षाही अधिक प्रकारच्या उत्पादनांचा पुरवठा प्रिसिजन करते.
जनरल मोटार्स, बीएमडब्ल्यू., फोर्ड आणि पोर्श्चे या जगातील बड्या वाहन उत्पादकांना प्रिसिजन पुरवठा करते. तसेच देशातील टाटा मोटार्स, ह्यून्दाई, मारूती, एस्कॉर्ट, इंडियन रेल्वे अशा ३० पेक्षाही अधिक उत्पादकांचा कंपनीचे ग्राहक आहेत. १९९२ साली वर्षाला केवळ ७२०० कॅमशाफ्ट्सचे उत्पादन करणारी कंपनी २०१० साली वर्षाला ९० लाख कॅमशाफ्ट्सचे उत्पादन करत होती. कॉर्पोरेट कंपनी बनण्यापर्यंतचा प्रवास प्रिसिजनने पूर्ण केला आहे.
दीर्घकालीन विस्तार योजनेअंतर्गत प्रिसिजनने २०१७-१८ या वर्षात एकूण तीन कंपन्या संपादित केल्या आहेत. इतर कंपन्या संपादित करणारी प्रिसिजन ही सोलापूरातील एकमेव कंपनी ठरली. प्रिसिजनने १० ऑक्टोबर २०१७ रोजी नाशिकमधील 'मेम्को इंजिनिअरिंग' ही कंपनी ताब्यात घेतली. २३ मार्च २०१८ रोजी प्रिसिजनने जर्मनीतील 'एम.एफ.टी.' ही कंपनी संपादित केली. १७ मे २०१८ रोजी नेदरलँड्समधील 'इमॉस मोबिल सिस्टिम्स बी. व्ही.' ही कंपनी प्रिसिजन समूहात दाखल झाली.
चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक यतिन शहा यांची दूरदृष्टी, धाडसी निर्णय व विस्तारीकरणाच्या महत्वाकांक्षी स्वप्नामुळे प्रिसिजनने प्रचंड झेप घेतली आहे. त्यांना डॉ. सुहासिनी शहा, रविंद्र जोशी, करण शहा यांच्यासह इतर संचालकांचीही मोलाची साथ लाभली आहे.