सोलापूर - लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १ लाख ४३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. फसवणूक झालेली तरुणी सध्या सोलापुरातच वास्तव्याला आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोहिनी मच्छीन्द्रनाथ मोरे (वय 25, रा. कुमठे, सोलापूर) असे या फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर अनिता शर्मा, निशांत अग्निहोत्री, ऋतिका शर्मा, अशी आरोपींची नावे आहेत.
लॉकडाऊन मध्ये मोहिनी मोरे या तरुणीची पुणे येथील नोकरी गेली होती. त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्या पासून मोहिनी मोरे सोलापूर शहरात मध्येच राहत आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या मोहिनीने वेगवेगळ्या ऑनलाईन वेबसाईटवर नोकरीसाठी नोंदणी केलेली आहे. याचाच फायदा घेत, तीन जणांनी मोहिनीला नोकरी लावतो, अशी थाप मारत मोठी रक्कम ऑनलाईन रित्या काढून घेतली आहे. 20 ऑगस्ट पासून मोहिनीला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन येऊ लागले. मी ऋतिका शर्मा बोलतेय एचडीएफसी बँकेत नोकरीच्या जागा निघाल्या आहेत. त्यासाठी तुम्ही इच्छुक आहेत का? असा प्रश्न विचारून नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर मोहिनेने तयारी दर्शवली असता, तिला अडीच हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी शर्मा हिने पुन्हा एकदा 5 हजार 500 रुपये, 6 हजार 200 रुपये असे २ वेळा भरण्यास सांगितले. नोकरीच्या आशेने मोहिनीने ती रक्कम भरली देखील.
पुढे 21 ऑगस्टला निशांत अग्निहोत्री याने आणखीन फोन करून पुन्हा पैसे मागितले आणि नोकरीचे आमिष दाखवले. 25 ऑगस्टला अनिता शर्मा या महिलेने एचडीएफसी बँकेतून बोलतेय, अशी बतावणी करत युनिफॉर्म, शूज, लॅपटॉपसाठी ऑनलाईन पैसे मागून घेतले. या गोष्टीवर विश्वास ठेवत मोहिनीने एकूण 1 लाख 43 हजार रुपये ऑनलाईन पेमेंट द्वारे भरले होते. परंतु कोणत्याही स्वरूपाची नोकरी न लावता तिची फसवणूक करण्यात आली.
शेवटी मोहिनी मोरे हिला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने 28 ऑगस्टला विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आरोपींची फक्त नावे माहीत आहेत, त्यांचा पत्ता माहीत नाही. तिची सर्व फसवणूक ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे पोलिसांपुढे आरोपी शोधून काढण्याचे मोठे आव्हान आहे. या प्रकरणी पोलीस नाईक पाटील पुढील तपास करत आहेत.