सोलापूर - माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राज्यसभा खासदार पदमविभूषण शरद पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने डी लिट(डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी जाहीर केली आहे. सोलापूर विद्यापीठातर्फे देण्यात येणारी ही दुसरी डी. लिट पदवी आहे. प्रयास मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.
खा. शरद पवार यांना डी. लिट मानद पदवीने सन्मानित करण्याबाबतचा प्रस्ताव प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून व्यवस्थापन परिषदेत ठेवण्यात आला होता. सिनेट सदस्य सचिन गायकवाड, राजाभाऊ सरवदे,प्रा राजेंद्र गायकवाड ,डॉ चंद्रकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले.
अधिसभेच्या 15 मार्च रोजी झालेल्या 23 व्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. त्यास सभागृहात अधिसभेने बहुमताने मान्यता दिली. सोलापूर विद्यापीठाने 2014 मध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सर्वप्रथम डॉक्टर ऑफ सायन्स (डी एस्सी) मानद पदवीने सन्मानीत केले होते. यापूर्वी डी.लिट ही पदवी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली होती. यंदा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना जाहीर झाली आहे.
प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेची मागणी मान्य-
देशातील युवकांसाठी शरद पवार यांचे जीवन हे मार्गदर्शक ठरणारे आहे. म्हणून प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पवार यांना डी.लिट पदवी देऊन सोलापूर विद्यापीठाच्या वतीने सन्मान करण्यात यावा, अशी मागणी प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेने केली होती. 23 व्या बैठकीत या मागणीला मान्यता देण्यात आली. लवकरच राज्यपालांच्या हस्ते ही पदवी प्रदान केली जाणार आहे.