सोलापूर- शहर व जिल्ह्यात गुरुवारी 1625 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1539 तर महापालिका हद्दीत 86 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी एकाच दिवशी 1 हजार 548 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये 1 हजार 429 जण हे ग्रामीण भागातील तर 119 जण हे महापालिका हद्दीतील आहेत.
गुरुवारी कोरोनाचा उपचार घेत असलेल्या 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 35 मृत हे ग्रामीण भागातील तर 9 जणांचा मृत्यू महापालिका हद्दीत झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात सध्या 16 हजार 893 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 15 हजार 618 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 1 हजार 275 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात नऊ बाधित रुग्णांचा मृत्यू-
कोरोना विषाणूची लागण झालेल्या ग्रामीण भागातील 35 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्यामध्ये सर्वाधिक 9 मृत्यू हे बार्शी तालुक्यातील आहेत. अक्कलकोट तालुक्यातील चार, माळशिरस तालुक्यात पाच, मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात प्रत्येकी दोन, उत्तर सोलापूर तालुक्यातील चार, पंढरपूर तालुक्यातील पाच व दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाच रुग्ण उपचारा दरम्यान दगावले आहे.
पंढरपूरमध्ये सर्वाधिक 296 जण बाधित-
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 1 हजार 539 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 296 रुग्ण पंढरपूर तालुक्यातील आहेत. अक्कलकोट तालुक्यात 42 रुग्ण आढळले आहे, बार्शी तालुक्यातील 193 रुग्ण , करमाळा तालुक्यातील 116 रुग्ण, माढा तालुक्यातील 178, माळशिरस तालुक्यातील 258, मंगळवेढा तालुक्यातील 157, मोहोळ तालुक्यातील 140, उत्तर सोलापूर तालुक्यातील 30, सांगोला तालुक्यातील 96 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 33 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.