सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वे स्थानके अधिक पर्यावरणपूरक होत आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सोलापूर विभागातील रेल्वे स्थानकावर काही महत्त्वपूर्ण बदल केले आहे. रेल्वे स्थानक पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या सोलापूर स्थानकास एनएबीसीबी (NABCB) मान्यताप्राप्त संस्थेकडून सप्टेंबर-2019 मध्ये आयएसओ 14001 मानांकन देण्यात आले होते. यानंतर सोलापूर विभागातील आठ रेल्वे स्थानकाकरता आयएसओ 14001 मानांकन मिळाले आहे.
आयएसओ मानांकन मिळालेले रेल्वे स्थानकामध्ये अहमदनगर, दौंड, कोपरगाव, लातूर, कलबुर्गि, साईनगर शिर्डी, वाडी आणि कुर्डुवाडी या रेल्वे स्थानकांचा सामावेश आहे.
सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक प्रदिप हिरडे यांच्याकडे आयएसओ 14001 मानांकन सुपूर्द करण्यात आले आहे. आयएसओ 14001-2015 प्रमाणपत्र मिळविणारे सोलापूर विभागात आता नऊ रेल्वे स्थानके झाली आहेत.
एनएबीसीबी (NABCB) मान्यता प्राप्त बोर्डाव्दारे लेखापरिक्षण करण्यात आले. ऑडिट केलेल्या काही बाबींमध्ये या स्थानकांच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, प्लॅटफॉर्मवरील कव्हर शेडवर सौरऊर्जेचे पॅनल बसवणे, प्लास्टिकमुक्त स्थानक बनवणे, यांत्रिकीकृत साफसफाईचा वापर, कचऱ्यांचे निर्मितीकरण करणे, वॉटर ऑडिट, ऊर्जा ऑडिट, ध्वनिप्रदूषण, प्रवाशांना देण्यात आलेल्या सोयीसुविधा, बॅनर, पोस्टर्स, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांव्दारे प्रवाशांची होणारी जनजागृती तसेच अन्य कार्याचा समावेश आहे.
दोन वेळा आयएसओ कंपनीच्या कर्मचाऱ्यानी या रेल्वे स्थानकांचे निरिक्षण केले. हे प्रमाणपत्र तीन वर्षासाठी वैद्य असणार आहे. या सर्व रेल्वे स्थानकाला या तीन वर्षांच्या काळात प्रमाणित संस्था नियमित अंतराने ऑडिट करतात आणि काही त्रुटी आढळल्यास त्याबद्दलचा अहवाल दिला जातो.