पंढरपूर - सध्या कोरोना विषाणूमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशा परिस्थितीमध्ये शहरातील सर्वोपचार रुग्णालय व खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन सोलापूर बाजार समितीने शेतकर्यांसाठी 50 बेडचे हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या आवारातच हे हॉस्पिटल उभारले जाणार आहे. तसा ठराव बाजार समितीच्या मासिक बैठकीत संचालक मंडळाने घेतला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक बैठकीत सभापति आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या कार्यालयात झाली. त्यावेळी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
शेतकर्यांना बेडची सोय व्हावी व योग्यवेळी उपचार करता यावेत यासाठी 50 बेडचे कोव्हिड हॉस्पिटल बाजार समितीच्या आवारात उभे केले जाणार आहे. तसा प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठविण्यात येणार आहे. जेणेकरून शेतकर्यांना बाजार समितीमध्ये माफक दरात कोरोनावर उपचार घेता येतील. यापूर्वी बाजार समितीने सर्वोपचार रुग्णालयासाठी पीपीई किट व व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याला परवानगी मिळण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन हे कोव्हिड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
यावेळी उपसभापति श्रीशैल नरोळे, जितेंद्र साठे, प्रकाश वानकर, नामदेव गवळी, राजकुमार वाघमारे, रामप्पा चिवडशेट्टी, अमर पाटील, आप्पासाहेब पाटील, वसंत पाटील, बाळासाहेब शेळके, केदार उंबरजे, बसवेश्वर इटकळे, शिवानंद पुजारी आदी उपस्थित होते.