सोलापूर - महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांचे नगरसेवक पद उच्च न्यायालयात रद्द ठरवण्यात आले आहे. 2017साली सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11मधून शिवसेनेच्या उमेदवार अनिता मगर भाजपा उमेदवारावर मात करून विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपाच्या भाग्यलक्ष्मी म्हंता यांना पराभूत केले होते. त्यानंतर भाजपाच्या पराभूत उमेदवार म्हंता यांनी सोलापूर न्यायालयात नगरसेविका अनिता मगर यांना तीन अपत्ये आहेत व तिसरे आपत्ये हे 12 सप्टेंबर 2001 रोजी जन्मलेले असल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम 10 प्रमाणे अपात्र आहेत व त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशा आशयाची याचिका दाखल केली होती.
सोलापूर जिल्हा न्यायालयाने देखील अनिता मगर यांचे नगरसेवक पद रद्द ठरवले होते-
सोलापूर कोर्टाने 2018साली नगरसेविका अनिता मगर यांचे नगरसेवक पद रद्द ठरविले होते. या आदेशाविरुद्ध मगर यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. सदर प्रकरणात 14 ऑक्टोबर 2020 रोजी अंतरिम सुनावणी घेण्यात आली. व निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्याचा निकाल 24 मे 2021 रोजी देण्यात आला या निकालात नगरसेविका अनिता मगर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले.
सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी चार आठवड्याची मुदत-
उच्च न्यायालयाने सोलापूर कोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. अनिता मगर यांच्या वकिलांच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्यांची स्थगिती मिळाली आहे. या प्रकरणात भाग्यलक्ष्मी म्हंता यांच्याकडून अॅड अजित आळंगे यांनी काम पाहिले. अनिता मगर यांच्यावतीने अॅड. विश्वासराव देवकर यांनी काम पाहिले. महापालिकेच्या वतीने अॅड विश्वनाथ पाटील तसेच सोलापूर न्यायालयात म्हंता यांच्याकडून ॲड. नीलेश ठोकडे यांनी काम पाहिले.