सोलापूर - हतूर व वडकबाळ येथे वारंवार जलवाहिनी फुटल्याचा प्रकार घडत आहेत. वडकबाळ येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने पाईपलाईनला लिंबू मिरची व बाहुले बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडच्यावतीने सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
उजनी धरण, हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे खापर जुन्या पाइपलाइनच्या गळतीवर माथी मारण्याचे काम महानगरपालिकेच्या प्रशासनाच्यावतीने केले जात आहे. वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे व पाणी गळतीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
प्रशासन व सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव-
सोलापूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन खूप जुनी झाली आहे. अनेक ठिकाणी ही पाईपलाईन फुटली आहे. पाणी गळतीचे प्रमाण 30 टक्के असल्यामुळे 30 टक्के पाणी शहरवासियांना मिळत नाही. प्रशासन व सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा नेहमी विस्कळीत होत असल्याचे संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष शाम कदम यांनी म्हटले आहे.
पाणी पुरवठ्यासाठी विशेष अधिकारी असूनही विस्कळीतपणा-
सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर व महापौर श्री कांचना यन्नम यांनी पाणीपुरवठा नियोजनासाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. तरीदेखील शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड सोलापूरच्यावतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, उपाध्यक्ष आशितोष माने, सोमनाथ पात्रे, नागेश पवार, संघटनेचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके, महेश तेल्लुर, सोमनाथ पात्रे, ओंकार कदम, आर्यन कदम व मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.