सोलापूर - पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट झाली होती. याभेटी दरम्यान संभाजी भिडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीत चर्चा केली. यावर आक्षेप घेत सोलापूर येथील माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम यांनी तीव्र विरोध केला असून मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंना भेटणे ही लोकशाहीला, पुरोगामी चळवळीला हरताळ फासणारी गोष्ट आहे, अशी प्रखर टीका केली.
हेही वाचा - सावळ्या विठुरायाच्या चरणी एक कोटीचे 'गुप्तदान'
मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील तुरुंगात असलेल्यांना सोडवणे गरजेचे
भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांनी 16 ते 17 विचारवंतांना अटक केली आहे. त्यांना तुरुंगात डांबले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील सर्व विचारवंतांना सोडवणे गरजेचे आहे. याउलट ते भीमा कोरेगाव दंगल घडवून आणणाऱ्या संभाजी भिडेंना भेटतात आणि बंद खोलीत चर्चा करतात. 84 वर्षीय स्टीफन यांना प्लास्टिकचा ग्लास उचलता येत नाही, अशा व्यक्तीला भीमा कोरेगाव प्रकरणात अटक केली जाते आणि तुरुंगातच त्यांना मारले जाते. केवळ हा संभाजी भिडेमुळे घडलेला प्रकार आहे. अशा संभाजी भिडे गुरूजीला भेटणे योग्य नव्हे, अशा तीव्र शब्दांत माकप राज्य सचिव नरसय्या आडम यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.
देवेंद्र फडणीवसांचा अजेंडा उद्धव ठाकरे राबविणार नाहीत अशी अपेक्षा
संभाजी भिडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघे बंद खोलीत चर्चा करून बाहेर आले. या बंद खोलीत कोण कुणाचे पाय धरले, हे माहिती होणे गरजेचे आहे. तसेच, विद्याविरोधी किंवा अंधश्रद्धेचा कायदा मोडणारे म्हणून संभाजी भिडेंची ओळख आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजेंडा राबविणार नाहीत आणि महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलाशी प्रतारणा करणार नाहीतस, अशी अपेक्षा माकपने व्यक्त केली.
हेही वाचा - वर्चस्वाच्या इर्षेतून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दोन शिवसैनिकांचा गेम, पाच आरोपींना अटक