सोलापूर- हलाखीचे जीवन जगणाऱ्या आई-वडिलांवर सहा वर्षाचा मुलगा हरवल्याने आभाळ कोसळल्याची, तर आईवडिलापासून चुकामूक झाल्याने दुरावलेल्या मुलावर भीतीचे सावट निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील एक चिमुकला वडलांबरोबर रेल्वेने प्रवास करत असताना, गर्दीत उतरता न आल्याने रेल्वेतच राहिला आणि पुढे सोलापूरला आला. त्यामुळे आईवडिलांवर मुलाच्या काळजीने आभाळच कोसळले होते. मात्र, सोलापूर पोलिसांनी त्या मुलाला त्याच्या पालकांपर्यंत सुखरुप पोहोच केले. त्यामुळे दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. शरणू रामचंद्र राऊर असे त्याचे नाव आहे.
शरणूचे वडील रामचंद्र हे गुलबर्गा जिल्ह्यातील चितापूर गावचे रहिवासी आहेत. त्यांना आलेल्या अपंगत्वावर उपचार करण्यासाठी ७ डिसेंबरला बाहेरगावी गेले होते. त्यावेळी हट्ट करून त्यांचा मुलगा शरणू हा देखील त्यांच्यासोबत गेला होता. मात्र, रेल्वेने माघारी परत येत असताना, शरणूचे वडील गुलबर्गा स्थानकात उतरले. मात्र, रेल्वेत मोठ्याप्रमाणात गर्दी असल्याने शरणूला खाली उतरता आले नाही आणि रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर सोलापूर स्थानकात रेल्वे थांबली असता, शरणू रेल्वेतून खाली उतरला आणि स्थानकातच आपल्या पालकांकडे जाण्यासाठी धडपड करू लागला.
भाषेवरून लागला संदर्भ-
आई वडिलांची आठवण येऊ लागल्याने त्याने त्यांच्या शेधात सोलापूर शहरात फिरायला सुरुवात केली. रडत रडत रस्त्यावर नागरिकांना थांबवून घराकडे जाण्याचा मार्ग विचारू लागला आईवडिलांकडे जाण्याची माहिती घेऊ लागला. त्यावेळी काही नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याची विचार पूस करत त्याच्या आई वडिलांच्या शोध सुरू केला. शरणू फक्त कन्नड भाषेत बोलत होता. त्यावरून त्याच्या कर्नाटकातील आईवडिलांना शोध घेण्यास मदत झाली. तसेच शरणू यांने चुकामूक झालेला प्रकार सांगितला आणि त्याला आठवेल तसा घरचा पत्ताही सांगितला. अखेर पोलिसांनी शरणु रामचंद्र राऊर (रा चितापूर,जि गुलबर्गा,कर्नाटक) याला सुखरूप त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले.