सोलापूर - राज्यात अनेक प्रश्न असताना धर्मा-धर्मात भांडण लावण्याचे कारस्थान सुरू आहे. भारत देश इंग्रजांच्या ताब्यात असताना भारतीय नागरिकांना न्याय मिळत होता, आता मात्र न्याय मिळणे अवघड झाले. मात्र आज तुमची वेळ आहे, उद्या आमचीही वेळ येईल, असा इशारा छगन भुजबळ यांनी विरोधकांना दिला. ते सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषद यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, की भाजपा सारखा विरोधी पक्ष आजतागायत पहिला नाही. चूक नसताना विरोधी पक्षाकडून ईडी किंवा सीबीआय सारखे चौकशीचे भुंगे लावून मंत्र्यांना तुरुंगात घातले जात आहे. ईडीची भीती महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांना दाखवली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र आहे घाबरणार नाही - हा महाराष्ट्र आहे, कोणत्याही बाबतीत घाबरणार नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुढे जाणार आहे. राज्याला अडचणीत आणण्याचे कार्य केले जात आहेत. तरी अशा अडचणीवर मात केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.