सोलापूर - कडक निर्बंध सुरू झाल्यापासून सोलापुरातील भीक मागून खाणाऱ्यांची उपासमार सुरू होती. कडक निर्बंधांचा सर्वाधिक फटका गोरगरिबांना बसला असून कोरोनाच्या महामारीने मरण्याची वेळ अनेकांवर आली आहे. भुकेने व्याकुळ होऊन पाहणारे डोळे पाणावले आहेत. या भुकेल्यांसाठी सोलापुरातील संभव फाऊंडेशनने स्तुत्य उपक्रम राबवत दररोज 400 जणांना मोफत अन्नाची सोय केली आहे. फूटपात आणि रस्त्याच्या कडेला बसून भीक मागणाऱ्या भिकऱ्यांना कडक निर्बंधांमध्ये पोट भरून जेवणाची व्यवस्था संभव फाऊंडेशचे आतीश शिरसठ,अस्मिता गायकवाड, गणेश पवार असे अनेक स्वयंसेवक यामध्ये काम करत आहेत.
वर्षभरापासून गोरगरीब, भुकेल्यांसाठी अन्नाची सोय
सोलापूर शहरात जवळपास 500 ते 1000 बेघर आहेत. रस्त्याच्या कडेला किंवा फूटपाथ, मंदिरासमोर, दर्ग्याच्या बाहेरील बाजूस आदी ठिकाणी भीक मागून खाणारे बसलेले असतात. गेल्या वर्षी 22 मार्च 2020पासून सोलापुरात आणि सर्व देशात कोरोना विषाणूच्या महामारीमुळे कडक निर्बंध सुरू आहे. शहरातील कोणत्याही नागरिकास विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भीक मागून उपजीविका चालवणाऱ्या बेघरांची मात्र उपासमार होऊ लागली आहे. अशा कठीण प्रसंगी सोलापुरातील संभव फाऊंडेशनच्या सदस्यांनी कंबर कसली आणि या भिक्षेकरूंना अन्नाची व्यवस्था करत त्यांना पोटभर जेवण खाऊ घालण्यास सुरुवात केली.
'दानशूर व्यक्तींकडून कपडे, चपला आणि चादरी'
शहरातील गोरगरिबांना अशा सामाजिक संस्था वेगवेगळ्या माध्यमातून पोट भर जेवणाची व्यवस्था करत आहेत. सद्यस्थितीत कोरोना विषाणूची लागण कोणालाही होत आहे. चांगले चांगले व्यक्ती या दुनियेतून नाहिशे झाले आहेत. आपल्याला देखील काहीही होऊ शकते अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे. यामुळे शहरातील अनेक दानशूर व्यक्ती पुण्याचे काहीतरी कार्य केले पाहिजे, असे विचार करून संभव फाऊंडेशनशी संपर्क करून या गोरगरिबांना चप्पल, कपडे, चादरी देत आहेत आणि फाऊंडेशनच्या वतीने देखील आवाहन करण्यात आले की, सोलापुरातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे आणि गोरगरिबांना, बेघरांना मदत करावी.
हेही वाचा - 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी रविवारपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होणार सुरू; यंत्रणा सज्ज