सोलापूर- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली. त्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाची स्थगिती उठवावी आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापूर जिल्हा बंद पाळण्यात येत आहे. या बंदला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला असून सोलापूर शहरातील व्यापारी संघटनांनीही सकलमराठा समाजाच्या या बंदात सहभागी होत पाठिंबा दर्शवला.
मराठा आरक्षणासाठी ५० हून अधिक मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाने आता आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्या बंदची हाक देण्यात आली होती. त्या बंदला जिल्हाभरातून प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळपासूनच सोलापूर शहरातही बंद सुरुवात झाली. सोलापुरातील मराठा संघनांनी यापुढे गनिमी कावा पद्धतीने आंदोलने करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शिवाजी चौकात सरकारचा प्रतिकात्मक तिरडी मोर्चाही काढण्यात आला.
नवी पेठ मधील व्यापारी असोसिएशनने या बंदला पाठिंबा दिला आहे. चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशने देखील या बंदला पाठिंबा दिला असून शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. सोमवारी सकाळी नवी पेठ मध्ये मराठा क्रांती मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी प्रताप चव्हाण, योगेश पवार, विजय पुकाळे, दिलीप कोल्हे, संजय शिंदे,शिरीष जगदाळे, सुनील रसाळे,दास शेळके आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात हा बंद पाळला जात आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पाळण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी तिऱ्हे गावचा स्टँडपरिसर दणाणून गेल्याचे चित्र पहायला मिळाले.
माढा तालुक्यातही बंद
मराठा आरक्षण प्रश्नी जिल्ह्यातल्या पहिल्या आंदोलनाची ठिणगी माढ्यात पडली. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी पहाटे ५.३० वाजताच टायर पेटवून केंद्र व राज्य सरकारचा मराठा समाजाच्या तरुणांनी निषेध केला. एक लाख मराठा,लाख मराठा लाख चा जयघोष यावेळी करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून माढ्यात रस्त्यावर टायर जाळून जिल्हा बंदला सुरुवात झाली. या आंदोलनात अन्य समाजाचे बांधव देखील सहभागी झाले होते. शंभु साठे याच्या नेतृत्वाखाली शरद वारगड, गौतम शिंदे, रणजित भांगे, सुधीर वारगड,आक्रमभाई कुरेशी, वैजिनाथ माळी, सागर पवार यांचेसह समाज बांधव उपस्थित होते.