सोलापूर - रमजान ईद म्हणजेच बरकती (भरभराट) आणि ईद म्हणजे आनंद. रमजान ईद साजरा करताना गोरगरिबांना मदत करा. यंदा भारतात आणि संपूर्ण जगात कोरोना महामारीने अनेक नागरिकांचे मृत्यू झाले आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना मदत करा. अशा उध्वस्त झालेल्या कुटुंबीयांचे सांत्वन करा, त्यांना दिलासा द्या, असे आवाहन मुस्लिम धर्मगुरू अमजद अली काझी यांनी केले आहे.
काझी म्हणाले, की रमजान सणाला मुस्लिम धर्मात दानधर्म करण्याला आणि मदत करण्याला अधिक महत्व आहे. तर सोलापूरसह देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण ऑक्सिजनविना तडफडून मृत्यूमुखी पडत आहेत. तर अशा रुग्णांसाठी ऑक्सिजनची मदत करा. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची किंवा त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन सोलापूर जिल्हा व शहर काझी अमजद अली यांनी आवाहन केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून रमजान ईद कडक लॉकडाऊनमध्ये किंवा कोविड महामारीच्या लाटेत येत आहे. तर सर्व मुस्लिम बांधवानी अल्लाहकडे दुआ म्हणजेच प्रार्थना करावी ही महामारीची दुसरी लाट कमी व्हावी.
ईद उल फितर -
मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर (रमजान सण) व दुसरी ईदुज्जुह (बकर ईद). ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते. ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर्यावर आनंद खुललेला दिसतो. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.
दोन वर्षांपासून कोविड महामारीत ईद साजरी केली जात आहे -
भारतातील मुस्लीम धर्मीय 14 मे रोजीच ईद साजरी करत आहेत. ईदच्या दिवशी मुस्लीम नागरिक नवे कपडे घालून शिरखुर्मासारखे गोड पदार्थ घरात बनवले जातात. दरवर्षी नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदानावर जात होते. परंतु कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराने गर्दी न करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यास मनाई करण्यात आली आहे.घरात राहून ईद साजरी करा आणि सोशल डिस्टन्स पाळा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना महामारीत मदत करण्यासाठी मुस्लिम नागरिक पुढे -
मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी किंवा विषाणूची साखळी तोडण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. यामुळे अनेक नागरिकांच्या उपजीविकेचे मोठे प्रश्न निर्माण झाले होते. अशा वेळी सर्वात अगोदर मुस्लिम नागरिकांनी परप्रांतात स्थलांतर होणाऱ्या पायी जाणाऱ्या नागरिकांची मदत करण्यास सुरुवात केली, अशी माहिती अमजद अली काझी यांनी दिली.