सोलापूर - शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडक लॉकडाऊन, करावा अशी मागणी केली जात आहे. सोलापूरात लॉकडाऊन करण्यापूर्वी सर्व घटकांशी चर्चा करूनच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
सोलापूर शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात यावी, अशी जोरदार चर्चा सोलापुरात सुरू झाली आहे. कडक संचारबंदीची मागणी देखील पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. सोलापुरात संचारबंदी लागू करण्यापूर्वी सर्व नागरिकांकडून संचारबंदी लागू केली जावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे सर्व संबंधित घटकांशी पूर्ण चर्चा करुनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. संचारबंदीबाबत शहरातील नागरिकांना पुरेशी माहिती अगोदर दिली जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कोरोना प्रसार रोखण्याबाबत आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी शहरातील काही कंटेनमेंट झोनला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या एकून घेतल्या त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ही माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे उपस्थित होते.
या बैठकीत बोलतांना पालकमंत्री भरणे म्हणालेस, की सोलापूर शहरातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने तीन तज्ज्ञ डॉक्टरांची समिती पाठवली आहे. या डॉक्टरांशी नागरिकांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता संचारबंदी लागू करावी, असे सर्वांचे मत आहे. त्यामुळे नागरिक, अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली जाईल, लॉकडाऊन ज्या दिवसापासून लागू केला जाणार आहे त्याच्या अगोदर किमान चार ते पाच दिवस जाहिर केला जाईल. त्याबाबत सर्व यंत्रणा सज्ज केल्या जातील आणि मगच लागू केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.