सोलापूर - ड्रेनेज लाईनचे काम करताना जुनी मिल चाळ व जैनोद्दीन चाळ येथील भिंत कोसळून चार मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सर्व मजुरांना ढिगाऱ्यामधून काढण्यात आले आहे. त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत भैय्या चौक येथील जैनोद्दीन चाळ, पाटील चाळ, व जुनी मिल चाळ येथे ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते. शनिवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास काम सुरू असताना चाळीच्या इमारतीची भिंत कोसळली. यामध्ये तहलिया वासुनिय (रा मध्य प्रदेश),निलेश फुलसिंग बोरिया(रा. मध्य प्रदेश), जिंघा वासुनिया(रा. मध्य प्रदेश),जेला वसुनिया ( रा. मध्य प्रदेश) हे चौघे मजूर जखमी झाले आहेत. हे चौघे मजूर स्मार्ट सिटी अंतर्गत ठेका घेणाऱ्या ठेकेदाराकडे कामास होते.
या घटनेनंतर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या नागरिकांनी भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले. जैनोद्दीन चाळ, पाटील,चाळ, जुनी मिल चाळ अत्यंत जुन्या काळातील चाळ आहेत. जुन्या काळातील ह्या चाळीमधील भिंती देखील कुजलेल्या अवस्थेत आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे येथील भिंत ढासळलेली होती. अशा धोकादायक चाळीत शनिवारी काम सुरू होते. संध्याकाळी 4 च्या सुमारास ड्रेनेज चे काम सुरू असताना भिंत कोसळली.
नगरवअभियंता संदीप कारंजे, महापालिका उपायुक्त पंकज जावळे, अग्निशामक दल अधिकारी केदार आवटे , नगरसेवक चेतन नरोटे ,विनोद भोसले , देवेन्द्र कोठे , माजी नगरसेवक दीपक राजगे, आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
जखमी परप्रांतीय कामगारांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांवर उपचार सुरू आहे. जखमीमधील दोन मजुरांचे पायांना मोठी जखम झाली आहे.