सोलापूर - शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक असले तरी ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना वापरण्यात येणारे शब्द याला मर्यादा असायला पाहिजे. त्याअनुषंगाने नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांविषयी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात त्यांना योग्य ती समज देण्यात आली आहे, असा स्पष्ट खुलासा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
धनगर समाजाच्या आरक्षणावरून उद्धव ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत'. असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठा संताप उसळला होता. पडळकर यांचा सर्वत्र निषेध सुरू असताना त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय सौजन्याचा स्तर ढळू न देता सावध प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पडळकर यांच्याही त्यांची चूक लक्षात आली, असे फडणवीस म्हणाले. एवढंच नाही तर पडळकर सोलापूर दौऱ्यातल्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित होते. त्यावरून फडणवीस यांनीच त्यांना थोडेसे दूर ठेवल्याची चर्चा उपस्थित भाजप कार्यकर्त्यां रंगली होती.