सोलापूर - वयोवृद्ध झालेल्या जन्मदात्या आईला पोटच्या मुलीने धक्के मारून घराबाहेर काढल्याची घटना शहरात समोर आली आहे. एवढेच नाहीतर नातवंडांनीही आजीला मारहाण केली आहे. याप्रकरणी 25 ऑगस्टला विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चनव्वा तिपन्ना बिराजदार(वय 81 ,रा, नरेंद्र नगर, विजापूर रोड, सोलापूर), असे त्या वृद्ध निराधार मातेचे नाव आहे, तर निलव्वा भीमराव बिराजदार, ज्योती भीमराव बिराजदार, विजयालक्ष्मी भीमराव बिराजदार, संतोष भीमराव बिराजदार अशी आरोपींची नावे आहेत.
चन्नवा बिराजदार ही वृद्ध महिला ८ महिन्यांपूर्वी मुलगी निलव्वा यांच्याकडे राहायला गेली होती. मात्र, वृद्ध आईचा सांभाळ करण्यासाठी मुलीला अवघड जात होते. त्यातही काही कामही करत नव्हती. यामुळे काही दिवस सांभाळ करून निलव्वा याने आईला हाकलून दिले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१९ला आई चनव्वा बिराजदार या पुन्हा आपल्या मुलीच्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुलीस चहा करायला सांगून खुर्चीवर बसल्या असता, चिडलेल्या नातवंडांनी तू पुन्हा आलीस का, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. निलव्वा यांनी देखील आईला मारहाण करत घरातून हाकलून दिले होते.
या घटनेनंतर पीडित वृद्धा शहरातील डॉ. नानासाहेब अर्जून यांच्याकडे वास्तव्याला होत्या. दरम्यान, तब्बल ८ महिने उलटल्यानंतर २५ ऑगस्टला चन्नवा यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात मुलीने घरातून हाकलून दिल्याबाबतची तक्रार दाखल केली. ज्येष्ठ नागरिक अधिनियम 2007 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.