सोलापूर - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेपासून सोलापूर महानगरपालिकेत सर्वसाधारण सभाच झाली नव्हती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पहिली सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सभेस सुरुवात झाली. सिद्धेश्वर साखर कारखाना, स्मार्ट सिटी या सारख्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षीत होते. मात्र प्रॉपर्टी कार्डच्या विषयानंतर समान निधी वाटपावरून पालिकेत एकच गोंधळ उडाला. गोंधळ कमी होत नसल्याने, अखेर महापौर श्रीकांचना यनम यांनी सभा तहकूब केली. सभा तहकूब केल्यानंतर त्या सभागृहातून जात असताना त्यांना इतर महिला नगरसेविकांनी अडविले, त्यामुळे गोंधाळात आणखी भर पडली.
भाजपा नगरसेवकाने फोडला माईक
माजी सभागृह नेता आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक सुरेश पाटील यांनी समान निधी वाटपाचा विषय समोर आणला. परंतु महापौर श्रीकांचना यनम यांनी हा सर्वसाधारण सभेचा विषय नाही, त्या विषयावर नंतर बोलू अशी भूमिका घेतल्यावर भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील हे आक्रम झाले. त्यांनी आपल्या हातातील माईक जमिनीवर आपटून फोडला.
महिला नगरसेविकांनी महापौरांना अडवले
समान निधी वाटप वरून सर्व नगरसेवक आक्रमक होत असताना महापौर श्री कांचना यनम यांनी सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला, आणि दालनातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. पण इतर महिला नगरसेविकांनी महापौर श्रीकांचना यनम यांना सभागृहाबाहेर जाऊ न देता मध्येच अडविले, त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट, हप्ता वसुली करणारा 'तो' पोलीस कर्मचारी अखेर निलंबित