सोलापूर - येथे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मातंग समाजाच्या मयत व्यक्तीच्या मृतदेहावर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात मनाई करून रस्त्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. ही घटना दोन महिन्यापूर्वी सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथे घडली होती. हा विषय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर महानगरपालिका नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी उपस्थित करून माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांना जाब विचारून धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावरून भाजप आमदार राम सातपुते आणि नगरसेवक आनंद चंदनशिवे यांमध्ये खडाजंगी उडाली. वाद वाढत जाऊन बैठकीत एकच गोंधळ उडाला होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या पालकमंत्री दत्ता भरणे यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला आणि पूढील विषयास सुरुवात केली. या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न उत्तरे सुरू होती.
दोन महिन्यांपूर्वी माळेवाडी येथे घडली होती घटना-
माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथे दोन महिन्यांपूर्वी दलित समाजातील एका व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले होते. निधनानंतर अंतिम संस्कार करताना दुसऱ्या समाजातील नागरिकांनी स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यास मज्जाव केला होता. अखेर त्या मृतदेहावर माळेवाडी येथील ग्रामपंचायती समोर अंतिम संस्कार करण्यात आले. हा संवेदनशील विषय सोलापुरात वाऱ्यासारख पसरला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी ताबडतोब संबधीत व्यक्तींवर कारवाई केली.
अन्यथा सीबीआयला पत्र लिहिणार:आमदार राम सातपुते-
अक्कलकोट विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर राम सातपुते देखील बोलू लागले. कोविड काळात काम करणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे. आणि भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांवर करावाई करा. अन्यथा, सीबीआय चौकशी लावा अशी मागणी केली. यावरून गोंधळ सुरू झाला आहे.
नगरसेवक आणि आमदारामध्ये खडाजंगी-
माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांनी सीबीआयला पत्र लिहितो असे म्हणताच सोलापूर महानगरपालिका नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दलितांवर होत असलेल्या अन्यायाबाबत सीबीआयला पत्र लिहा. माळशिरस विधानसभा मतदार संघात दलित मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यास मज्जाव केला जातो. आजही संबंधित संशयित आरोपी मोकाट आहेत. असे उत्तर देत आवाज वाढविला. भाजप आमदार राम सातपुते यांनी देखील जोरजोरात उत्तरे देण्यास सुरुवात केली. पालकमंत्री दत्ता भरणे यांनी खुर्चीवरून उठून दोघाना शांत केले. आणि पुढील विषयास सुरुवात केली.
हेही वाचा - साक्षीदार किरण गोसावी लखनौ पोलिसांना येणार शरण, ऑडिओ क्लिप व्हायरल