सोलापूर - खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने इंधनदरवाढ करून जनतेचा विश्वासघात करत आहे, म्हणून इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसने शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस सुमीत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्ञान प्रबोधिनी शाळा येथून सुपर पेट्रोल पंपापर्यंत चारचाकी गाडी ओढत नेऊन पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध करून प्रतिकात्मक विश्वासघात आंदोलन केले.
'खोटे बोलून सत्तेवर आलेले सरकार'
अंबादास बाबा करगुळे म्हणाले, की 2014 व 2019च्या निवडणुकीत मोदी सरकार किंवा भाजपा सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे. जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. याउलट केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढच होत गेली आहे.
'जनतेचा विश्वासघात केला'
कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले आहे. इंधनाची भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. त्याचप्रमाणे देशात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवा, महिला, व्यापारी, उद्योजक, सर्वसामान्य नागरिक मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त झाले आहेत. अशीच इंधनदरवाढ होत राहिल्यास जनतेला आपल्या गाड्या ढकलत घेऊन जावे लागेल. म्हणून आज चारचाकी वाहन ढकलत विश्वासघात प्रतिकात्मक आंदोलन केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध केला.