सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ( Punyashlok Ahilya Devi Holkar ) विद्यापीठाने परीक्षाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ( Solapur University Exam Date ) 20 जून ऐवजी 14 जुलै पासून सुरू होणार आहेत. तसेच वर्णनात्मक परीक्षा ऐवजी वस्तुनिष्ठ परीक्षा व ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. याबाबत अधिकृत माहिती परीक्षा नियंत्रण मूल्यमापन मंडळाचे प्रमुख डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली. आज शनिवारी 18 जून रोजी सोलापूर विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांनी व एबीव्हीपी आणि एनएसयुआय कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारसमोर मोठे आंदोलन केले होते. आषाढ वारी 10 जुलै रोजी होणार आहे. सोलापूर विद्यापीठाच्या सर्व शाखांच्या परीक्षा या 20 जून ते 7 ऑगस्ट दरम्यान होणार होत्या. या परीक्षा रद्द करण्यात याव्या आणि वारी नंतरच परीक्षा घेण्यात याव्या, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी व विविध संघटनांनी यापूर्वी सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेबाबत विरोध केला होता. सर्वस्तरातून आलेल्या या मागणीला ग्राह्य धरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने परिक्षेबाबत मोठा बदल केला आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार - शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार तसेच बीओएसच्या प्रश्नपत्रिका रचनेनुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा 20 जून 2022 पासून ऑफलाइन व डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षा विभागाकडून पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार होत्या. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने आज शनिवारी 18 जून रोजी दिलेल्या माहितीनुसार 14 जुलै 2022 पासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होतील.
ऑफलाईन आणि वस्तुनिष्ठ परीक्षा होणार - ऑफलाइन व डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने सोलापूर विद्यापीठाच्या घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षा विभागाकडून पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन आणि वर्णनात्मक पद्धतीने घेतल्या जाणार होत्या. परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रमुख डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या सोलापूर विद्यापीठाच्या सर्व पेपर या वस्तुनिष्ठ आणि ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.
हेही वाचा - Anti Agnipath Protest : अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात उद्रेक, ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड आंदोलने