सोलापूर - सत्तास्थापनेचा मुहूर्त नाही, पण हे सरकार पडल्यावर सक्षम सरकार देणार, असे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केले. ते सोलापुरात बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार -
हे सरकार नाकर्ते असून यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडू, असे फडणवीस म्हणाले. आम्ही सातत्याने आंदोलने करून समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधत आहोत. हे सरकार असंगाचा संग आहे. त्यामुळे ते निश्चितच फारकाळ टिकणार नाही, असेही ते म्हणाले.
वीजबील थकबाकीची सरकारने चौकशी करावी -
भाजपाची सत्ता असताना वीज कंपन्यांमध्ये अनेक सुधारणा झाल्या. आम्ही सर्वात कमी पैशांत वीज खरेदी केली. या कंपन्यांमध्ये आमच्याच काळात सुधारणा झाल्या. तसेच सरकार या कंपन्यांची जी थकबाकी दाखवत आहेत, ती त्यांच्याच काळातील आमच्या नावाने दाखवत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. आमच्या काळात वीजबील थकीत असतील तर, या सरकारने त्याची चौकशी करावी. तीन वर्षे सातत्याने दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनी बील न भरताही आम्ही त्यांची वीज न कापता पुरवठा केला होता, त्यामुळे थोडी थकबाकी होती, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर, हे सरकार सावकारी प्रवृत्तीचे असल्याची खरमरीत टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.
आम्ही स्वबळावर लढू आणि जिंकू -
हे सरकार कोसळल्यानंतर निवडणूक झाल्यास भाजपा स्वबळावर लढेल आणि निवडणूक जिंकू देखील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रावसाहेब दानवेंचा सरकार स्थापनेचा दावा -
येत्या दोन ते तीन महिन्यांत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार सत्तारुढ होईल, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. जे कधी एकमेकाचं तोंड पाहात नव्हते, ते तीन पक्ष एकत्र आले आहेत, असे ते म्हणाले. मात्र, या पक्षांमध्ये कुठलाच पायपोस नसल्याने राज्यात भाजपा सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी परभणीत व्यक्त केला.
हेही वाचा - येत्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार, रावसाहेब दानवेंचा दावा