सोलापूर - चोरट्याची एटीएम फोडण्याची एकच धडपड सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. नाकाला रुमाल बांधून तब्बल 10 मिनिटे त्याने स्क्रू, पक्कड व पान्याच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्न केला. शेवटी अयशस्वी झाल्याने तो रिकाम्या हातीच परतला. ही घटना रविवारी पाहटे 4 च्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही रोख रक्कम चोरट्यास घेऊन जाता आली नाही.
सोलापूर जिल्हा परिषद जवळील भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखेच्या बँकेचे एटीएम रविवारी पहाटे 4 च्या सुमारासे अज्ञात व्यक्तीने फोडण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी बँकेला सुट्टी असल्या मुळे बँकेचे कोणतेही अधिकारी बँकेत आले न्हवते. रविवारी सकाळी त्याच बँकेचे तत्कालीन अधिकारी पैसे काढण्यासाठी आले असता त्यावेळी त्यांना असे निदर्शनास आले, की एटीएम थोडेसे सरकले आहे. त्यांनी ताबडतोब बँकेच्या एका अधिकाऱ्याला याची कल्पना दिली.काही वेळातच बँकेचे सर्व अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी सर्व एटीएम तपासून पाहिले. चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब फौजदार चावडी पोलीस ठाण्यास ही माहिती कळविली. बँकेचे अधिकारी अमोल यांनी देखील माहिती देताना सांगितले की, चोरीचा हा प्रयत्न फसला आहे. सुदैवाने कोणतीही रक्कम त्याला लंपास करता आली नाही.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली व त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी सांगितले. याघटनेत सीसीटीव्ही फुटेज व ठसे तपास करून पुढील शोध घेण्यात येणार असल्याचे देशमाने यांनी सांगितले.
चोरट्याचा अयशस्वी प्रयत्न
रविवारी पहाटे 4 च्या सुमारास एटीएम फोडण्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्याचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. चोरट्याने सर्व साहित्य आणले होते. परंतू त्याला एटीएम तुटले नाही व त्यामधून रक्कम काढता आली नाही. लॉकडाऊनमध्ये देखील चोरट्यांच्या सुळसुळाट सुरूच आहे. चोऱ्या काही कमी होत नाहीत. एटीएम, बंद घरे, बंद दुकाने यांची चोरी सुरूच आहे.