सातारा/सोलापूर - ऐन दिवाळीत दोन वेगवेगळ्या अपघातात 8 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर 19 जण जखमी आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झाले असून 13 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरा अपघात पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गावर उंब्रज (ता.कराड) येथ झाला. तारळी नदीच्या पुलाचा कठडा तोडून ट्रॅव्हलर 50 फूट खोल नदीपात्रात कोसळली. यामध्ये ट्रॅव्हलरमधील 5 जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभिर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात-
अपघातग्रस्त रुग्णवाहिका मृतदेह घेऊन तेलंगाणा राज्यात जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सहा जण रुग्णवाहिकेतून पुण्याहून हैद्राबादला जात होते. आज पहाटे 3 वाजता भरधाव वेगात असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाला ताबा सुटला आणि रुग्णवाहिका समोर जाणाऱ्या ट्रकला धडकली.
यामध्ये रवी माणिक राठोड (वय 38 वर्ष, रा माळवाडी, वारजे, पुणे), बुद्धीबाई चण्णा पाळत्या (वय 48 वर्ष, रा माळवाडी, वारजे, पुणे) आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर गाडी पन्नास फूट खोल नदीपात्रात कोसळली-
कराड येथील तारळी नदीच्या पुलाचा कठडा तोडून टेम्पो ट्रॅव्हलर 50 फूट खोल नदीपात्रात कोसळली. त्यात ५ जण जागीच ठार झाले तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना आज (शनिवारी) पहाटे घडली. मृतांमध्ये तीन पुरुष एक महिला आणि तीन वर्षांच्या लहान मुलाचा समावेश आहे.
नवी मुंबईहून टेम्पो ट्रॅव्हलरने गोव्याकडे निघाले असता हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर जे किरकोळ जखमी होते ते रस्त्यावर आले. त्याच वेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काहीजणांना त्यांनी अपघाताची माहिती दिली. त्यानंतर तातडीने जवळच्या उंब्रज पोलिसांना अपघाताबाबत कळविण्यात आले. पोलीस आल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू झाले. जखमींना अपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा- सालेकसा पोलिसांच्या वाहनाला अपघात; पोलीस शिपायाचा मृत्यू, तीन कर्मचारी जखमी
हेही वाचा- प्रदूषणाची पातळी वाढली; पूर्व दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक 337 वर