पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला कथितरित्या शिवीगाळ झाल्याच्या कथित ऑडिओ क्लिपवरून भाजपवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्याची टीका चाकणकर यांनी केली आहे.
ठेकेदाराने न केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या महिला कार्यकारी अभियंत्यांना त्यांच्या आई बहिणीवरून शिवीगाळ करणे अतिशय संतापजनक आहे. पुणे महापालिकेत आपली सत्ता आहे. आपण आमदार आहेत, त्याचा रुबाब आपल्या घरी आपण दाखवावा. पालिका अधिकाऱ्यांवर नाही. पालिका अधिकारी हे तुमचे कार्यकर्ते नाहीत. आमदार सुनिल कांबळे हे ज्या पद्धतीने महिलांना बोलले आहे. त्या अर्थाने एक समजत आहे की, भाजपाच्या असंस्कृतपणाच्या चिखलातच अश्याच पद्धतीची कमळं उगवणार आहेत. कारण त्यांची मातृसंस्था असलेल्या आरएसएसचे हे संस्कार आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण -
पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला फोनवरून शिवीगाळ झाल्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमधील शिवीगाळ करणारे व्यक्ती हे कथितरित्या भाजप आमदार सुनील कांबळे असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र कांबळे यांनी हे आरोप फेटाळले आहे. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही असे कांबळे यांनी म्हटले आहे.
'कांबळेंनी जाहीर माफी मागावी अन्यथा...'
महाराष्ट्राची सुजाण आणि सुसंस्कृत जनता अश्या प्रवृत्तीला महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. कांबळे यांनी महिलांची तसेच त्या महिला अधिकाऱ्यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा, तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी चाकणकर यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या आमदारांनी पाठवले होते पत्र -
काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधले होते हे विशेष. दरम्यान, यावरून आता विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केले जात आहे.
हेही वाचा - भाजपा आमदाराची महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ! कथित ऑडिओ क्लिप व्हायरल