पुणे - राहत्या घरातून गांजा आणि चरसची विक्री करणाऱ्या एका महिलेला पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्याच्या कोंढवा परिसरातील भाग्योदयनगरमधून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या महिलेच्या घरातून 21 किलो गांजा आणि 569 ग्रॅम चरस असा सहा लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या महिलेविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. समिना मेहमूद शेख (वय 35, रा. नजारा मंजील, सदनिका क्रमांक 203, भाग्योदय नगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे आणि अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाने अशा गुन्हेगारांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती.
घरातूनच चोरून गांजा व चरस विक्री
दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक मनोज साळुंखे यांना त्यांच्या विश्वासू बातमीदाराने माहिती दिली होती की, " कोंढवा येथील भाग्योदय नगरमध्ये राहणारी महिला समीना शेख ही राहत्या घरातून चोरून गांजा व चरस या अमली पदार्थांची विक्री करत आहे" या माहितीची खातरजमा केल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोंढवा येथील नजारा मंजील या इमारतीत राहणाऱ्या महिलेच्या घरावर छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांना महिलेच्या घरातून 21 किलो 260 ग्रॅम गांजा आणि 569 ग्रॅम 17 मिली ग्रॅम चरस सापडले. या सर्व अंमली पदार्थांची एकूण किंमत 6 लाख 57 हजार 868 रुपये इतकी आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस कर्मचारी प्रवीण शिर्के, सुजित वाडेकर, मारुती पारधी, पांडुरंग पवार, संदीप जाधव, मनोज साळुंखे, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, विशाल दळवी, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली.