पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मागील काही दिवसांपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शिवाय शनिवार आणि रविवार असा विकेंड कडक लॉकडाऊन देखील लागू करण्यात आला होता. मात्र, आता हा विकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात आल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. राजेश टोपे यांनी आज पुण्यातील विधान भवन येथे कोरोना आढावा बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा - जीएसटी परिषदेची बैठक सुरू; कोरोना उपचारातील औषधांना जीएसटीत सवलत मिळणार?
- विकेंड लॉकडाऊन रद्द -
विकेंड लॉकडाऊन असल्यामुळे शनिवार आणि रविवार पुणे शहरातील दुकाने बंद होती. परंतु विकेंड लॉकडाऊन रद्द केल्यामुळे पुण्यातील दुकाने सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत सुरू राहणार आहेत. राज्यभरात लागू असलेला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला असल्याची माहितीही टोपे यांनी यावेळी दिली. परंतु त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
- म्यूकरमायकोसिस उपचारासंदर्भातही महत्त्वपूर्ण घोषणा
राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना म्यूकरमायकोसिस उपचारासंदर्भातही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्येही म्यूकरमायकोसिस आजारावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार मिळणार आहेत. पुण्यातील रुबी, जहांगीर यासारख्या खासगी हॉस्पिटलचा सरकारी यादीत समावेश करण्यासाठी पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच काही रुग्णालयांकडून मात्र अव्वाच्या सव्वा बिल वसूल केले जात आहेत. यावर आळा घालण्यासाठीही सरकारकडून पाऊलं उचलण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयातील प्रत्येक बिलाचे ऑडिटर मार्फत ऑडिट केले जाईल, असे राजेश टोपे यांनी यावेळी जाहीर केले.
हेही वाचा - 'एका वर्षात 1 हजार अॅलोपॅथी डॉक्टरांना आयुर्वेदात रुपांतरीत करेन'