पुणे - कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याने, सारसबाग अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. तसेच शहरात ज्या उद्यानांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्या उद्यानामध्ये नियमांचे पालन न झाल्यास, ते देखील बंद करण्यात येतील, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने, अनेक महिन्यांपासून बंद असलेली उद्याने महापालिकेकडून 1 नोव्हेंबरपासून खुली करण्यात आली होती. उद्याने सुरू करताना दहा वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक, गर्भवती महिला, अन्य आजार असलेल्या व्यक्तींना प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र उद्याने सुरू झाल्यानंतर दहा वर्षांखालील मुले आणि ज्येष्ठ नागरिकही उद्यानात येत असल्याचे निदर्शनास आल्याने, सारसबाग उद्यान अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. उद्यानामधील व्यायामाचे साहित्यही वापरले जात असून, उद्यानामध्ये येणारे अनेक नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचेही आढळले आहे.