पुणे - घरात भांड्याला भाडे लागले म्हणजे भांडण होतेच, ही घरातली नीती राजकारणातही आहेच. त्यामुळे सरकार टिकवायचे की नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
'ठिकठिकाणी करणार आंदोलन'
प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सुरू आलेल्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले. वंचित बहुजन आघाडीतील मुस्लीम कार्यकर्त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
'शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा कृतीशील'
27 जानेवारीला दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन केले जाईल. सीएए, एनआरसीला जसा मुस्लीम समाजाने लाखोंच्या संख्येने विरोध केला तसा कृषी कायद्यांना मुस्लीम समुदाय विरोध करेल. मुस्लीम समाज केवळ धार्मिक मुद्द्यावर नाही, तर शेतीच्या प्रश्नावर ही आंदोलन करेल, असा संदेश देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने कृषी कायद्यांना विरोध केला. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. मात्र तो कृतीशील पाठिंबा नव्हता. आमचा पाठिंबा कृतीशील राहील, असे आंबेडकर म्हणाले.
'राजीनामा मागितला पाहिजे'
धनंजय मुंडे प्रकरणावर बोलताना, धनंजय मुंडे प्रकरण हा त्यांचा पक्षाच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. त्यामुळे राजीनामा मागितला पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले. धनंजय मुंडे प्रकरणी निवडणूक आयोगाकडे जे गेले ते सोंग घेत आहेत. अज्ञान दाखवत आहेत. या प्रकरणात क्रिमिनल कोर्टात जायचे सोडून निवडणूक आयोगाकडे का जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.