पुणे - 'आज के शिवाजी; नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशनावरून सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाद पेटला होता. विविध स्तरांमधून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. आता छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांनी संबंधित प्रकरणावर मौन सोडले आहे.
गळ्यात पट्टा नसलेल्या आणि रस्त्यावर फिरणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी घणाघाती टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. यावर पुढे बोलताना 'सावध राहा...परत जर बोलाल, तर लोक तांगडून मारतील, असा सज्जड दम त्यांनी भरलाय. तसेच शिव-जयंत्या तीन वेळा का साजऱ्या करण्यात येतात, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणाऱ्या पुस्तकावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया द्यावी, यासाठी शिवभक्तांकडून मागणी करण्यात येत होती. या विषयावर भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
अशा प्रकारे तुलना करण्याच्या प्रकारचा निषेध करत असून या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली. कुठल्याच पक्षाला महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले.
महाराज हे युग पुरुष होते. त्यामुळे जाणता राजा फक्त एकच; बाकी कोणाला महाराजांची उपमा देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. महाराजांशी तुलना सोडा पण कोणीही त्यांच्या जवळपास देखील जाऊ शकत नाही, असे उदयनराजे म्हणाले.
शिवसेना भवनावर असलेल्या बाळासाहेब आणि महाराजांच्या फोटोवरून देखील त्यांनी शिवसेनेवर टीका केली. बिनपट्ट्याच्या लोकांना लायकी दाखवून देणार, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. तसेच स्वार्थाने एकत्र येणारे लोक फार काळ टिकत नाहीत, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लागावला आहे.