पुणे - शहरातील पाषाण तलावाजवळ जिवंत जुळी अर्भके आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही दोन्ही अर्भके एक दिवसाची असल्याचे समजते आहे.
सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना तलावाच्या काठावर गोधडीत बांधलेली दोन अर्भक आढळून आली. अर्भकांच्या रडण्यामुळे त्यांचे लक्ष त्याच्या वर गेले. या अर्भकांपैकी एक मुलगा व एक मुलगी आहे.
ही अर्भके भुकेने व्याकुळ झाल्यांने आणि थंडीमुळे रडत होती. परिसरातील नागरिकांनी या अर्भकांना दूध पाजून पोलिसांना याबाबत माहिती दिली. या बालकांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दोन्ही अर्भकांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती या वेळी डॉक्टरांनी दिली. पोलीस मातापित्यांचा तपास करत आहेत.